जळगाव। गटारी साफ केल्यानंतर त्यावर जंतुनाशकांची फवारणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत असते. अशा प्रकारच्या जंतुनाशकाची फवारणीची गरज कचरा कुंडी, कंटेनेर, गटारी बाहेत तसेच सार्वजनिक शौचालय येथे करणे गरजे आहे. परंतु, जवळपास 22 लाख किंमतींचे जंतुनाशक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गेल्या 6 महिन्यांपासून गोडावूनमध्ये पडून असल्याचे धक्कादायक बाब सभापती वर्षा खडके, भाजपा नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या पाहणीत समोर आली. शहरात कचरा उचलल्यानंतर त्यांवर जंतुनाशक फवारणे आवश्यक असते. मात्र, जानेवारी महिन्यात प्रत्येक आरोग्य निरीक्षकांनी केवळ 5 लिटर जंतुनाशकांची उचल केलेली आढळून आली आहे.
आरोग्य विभागाच्या गोडावूनमध्ये कचरा
जंतुनाशक तसेच दुर्गंधीनाशक हे कचरा कुंडी, कंटनेर, गटारीबाहेर मारणे आवश्यक असतांना आरोग्य अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केलेले स्पष्ट दिसत होते. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर शहरात स्वच्छता व्हावी यासाठी प्रयत्न करीत असतांना आरोग्य विभागाच्या गोडावूनमध्येच अस्वच्छता आढळून आली आहे. या पाहणीत गोडावूनमध्ये विमल गुटख्याची खाली पाकिटे सर्वत्र पडलेली दिसून आली.
आरोग्य अधिकार्यांना फटकारले
जंतुनाशकांच्या आवक जावक रजिस्टरमध्ये देखील अक्षम्य अशा चुका सभापती खडके यांना दिसून आल्या. यात आवक जावकमध्ये तारखांची नोंद केलेली नव्हती. शेवटची नोंद ही फेब्रुवारी महिन्यातील असून 5 लाख नागरिकांसाठी प्रत्येक आरोग्य निरीक्षकाने केवळ 5 लीटर जंतुनाशकाची उचल केलेली असल्याचे आवक जावक रजिस्टरवरून स्पष्ट होत आहे. याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना सभापतींनी जाब विचारून गटारींवर नियमीत फवारणी करणे, स्वच्छता राखणे, कचरा उचलल्यानंतर जंतुनाशकांची तात्काळ फवारणी करण्याचे आदेश दिलेत.
1700 लीटर जंतुनाशक पडून
महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने विकास कामांना निधी मिळत नसतांना आरोग्य विभागाला जंतुनाशक व दुर्गंधीनाशक खरेदी करण्यासाठी 22 लाख रूपये अदा करण्यात आलेले आहे. मात्र, या जंतुनाशक व दुर्गंधीनाशकांचा वापर आरोग्य विभागाकडून होतांना दिसून येत नाही. सभापती खडके यांच्या पाहणीत 1700 लीटर जंतुनाशक व दुर्गंधीनाशक औषधांचा स्टॉक आढळून आला.