22 एप्रिलला बीडीडी पुनर्विकासाचे भूमिपूजन

0

मुंबईः गेली अनेक वर्षापासून रखडलेल्या बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचा अखेर मार्ग मोकळा झाला असून या पुर्नविकास प्रकल्पाचे भूमिपूजन 22 एप्रिल 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील जांबोरी मैदानावर होणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची पत्रिका छापून वाटण्याचे कामही म्हाडाकडून सुरू करण्यात आले.

बीडीडी चाळीच्या पुर्नविकासासंदर्भात यापूर्वी अनेकवेळा विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. यंदाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनातही त्याविषयीचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दोन आठवड्यात बीडीडी चाळींच्या पुर्नविकास प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार बीडीडी चाळींच्या पुर्नविकास प्रकल्पाचे भूमिपूजन वरळी येथील जांबोरी मैदानावर सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली भुमिपूजन करण्यात येणार आहे.

बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाच्या पहिल्या टप्प्यात फक्त ना.म.जोशी मार्गावरील आणि नायगांव येथील बीडीडी चाळींचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. तर वरळी आणि शिवडी येथील बीडीडी चाळींचा दुसर्‍या टप्प्यात पुर्नविकास होणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील एका अधिकार्‍याने सांगितले.

या कार्यक्रमासाठी मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, खासदार अरविंद सावंत, खासदार, राहुल शेवाळे, लोअर परळ येथील आमदार सुनिल शिंदे, कालिदास कोळंबकर यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव सुमिल मलिक, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत