22 जुलै : तिरंगा राष्ट्रध्वजाचा निर्मिती दिवस!

0

स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज कशा प्रकारचा असावा त्यावर कोणत्या प्रकारची चिन्हे असावीत यावर अनेकांची वेगवेगळी मते होती. 22 जुलै 1947 या दिवशी सध्या अस्तित्वात असणार्‍या राष्ट्रध्वज सर्वप्रथम घटना समितीसमोर आला. दीर्घकाळ स्वातंत्र्याचा लढा दिल्यानंतर आणि लक्षावधी हुतात्म्यांनी देशासाठी देहाची आहुती दिल्यानंतर स्वतंत्र भारतासाठी राष्ट्रध्वज ठरवला गेला तो दिवस हाच होता. मछलीपट्टणमच्या पिंगली व्यंकय्या यांनी हा ध्वज तयार केला.

घटना समितीच्या बैठकीत पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यासंदर्भातला ठराव मांडला होता. भगवा, पांढरा, हिरवा आणि मधोमध निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेला हा ध्वज फार विचार करून बनवला गेला आहे. ध्वजाचा प्रत्येक रंग आणि अशोकचक्र ही विशिष्ट गुणांची द्योतक आहेत. भगवा किंवा केशरी हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा प्रकाश, शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा तर हिरवा समृद्धी आणि निसर्गाचे भूमीशी असलेले नाते व्यक्त करणारा रंग. मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्‍वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे. देशाची अस्मिता दर्शवणारा हा राष्ट्रीय ध्वज कसा असावा, कसा वापरावा आणि कधी वापरावा याचे नियम भारतीय घटनेने घालून दिलेले आहेत. हा ध्वज खादी, रेशमी अथवा लोकरी कापडापासून बनवला जावा तसेच त्याची लांबी रुंदी 3 : 2 अशा प्रमाणात असावी. ध्वज फडकवताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकवला जावा. शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरवताना बिगुल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरवला जावा. केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकवला जातो.

भारताला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947 रोजी. मात्र, स्वतंत्र भारताचा पहिला तिरंगा फडकला तो 16 ऑगस्ट रोजी. जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा प्रथम फडकला तो 29 मे 1953 रोजी, तर 1984मध्ये भारतीय ध्वज अंतराळात नेला गेला तो विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या अंतराळातील स्पेस सूटबरोबर. पहिला भारतीय ध्वज 1904 साली बनवला गेला होता. मात्र, तो तिरंगा नव्हता. स्वामी विवेकानंदाच्या आयरिश शिष्या भगिनी निवेदिता यांनी हा लाल पिवळ्या रंगाचा ध्वज फडकावला होता व नंतर तो निवेदिता ध्वज याच नावाने ओळखला जाऊ लागला. 22 ऑगस्ट 1907 साली मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनीच्या भूमीवर प्रथम भारतीय ध्वज फडकावला. मात्र, हाही आत्ताचा तिरंगा नव्हता असे इतिहास सांगतो.

राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.

– जयवंत हाबळे
मुख्य उपसंपादक,मुंबई
8691929797