मुंबई । भारतीय भाषांतील आघाडीच्या लेखकांचे सर्वात मोठे व्यासपीठ असलेला चौथा गेटवे लिटफेस्ट 22 ते 24 फेब्रुवारी 2018 रोजी एनसीपीए येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय साहित्यातील महिला शक्ती ही यावर्षीच्या लिटफेस्टची मध्यवर्ती संकल्पना आहे. भाषांतील लेखनासाठी सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा महोत्सव महिला लेखकांचे सर्वात मोठे स्नेहसंमेलन ठरणार आहे. या महोत्सवात 20 भाषांतील 50 आघाडीच्या तसेच नवोदित लेखिका आणि साहित्य तसेच चित्रपट क्षेत्रातील आघाडीची 20 नावे सहभागी होणार आहेत.
प्रादेशिक भाषांतील लेखनाला व्यासपीठ मिळवून देणारा महोत्सव
प्रादेशिक भाषांतील लेखनाला व्यासपीठ मिळवून देणारा अशा प्रकारचा हा पहिलाच महोत्सव आहे, मुंबई स्थित मल्याळम प्रकाशन संस्था काक्का आणि कम्युनिकेशन कन्सल्टन्सी फॅशन 4 कम्युनिकेशन या संस्थांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आसामी, अहिराणी, बंगाली, भोजपुरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, खासी, काश्मिरी, कोंकणी, कोसली, मल्याळम, मराठी, मणिपुरी, मैथिली, ओडिया, पंजाबी, सिंधी, तेलुगू, कन्नड आणि तामिळ या भाषांतील ख्यातनाम लेखक तीन दिवस चालणार्या या साहित्य महोत्सवात सहभागी होणार आहेत. गेल्या तीन महोत्सवांत जवळपास सर्व भारतीय भाषांतील 200 हून अधिक नामांकित लेखकांनी भारतीय साहित्यातील बदलत्या प्रवाहांवर चर्चा करून त्यावर आपली मते मांडली.