अविनाश म्हाकवेकर
बदल हवा म्हणून भाजपा निवडला; पण ‘नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा’ निघाला. सत्तेचा सोपान मिळण्यापूर्वी आपण केलेले आरोप सिद्ध करण्याचे दायित्व नसल्याचेच गेल्या दोन वर्षातील त्यांच्या कारभारातून दिसते आहे. तिकडे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचा मात्र, कुंभकर्ण झाला आहे. सहा महिने झोपतो आणि एक दिवसासाठी जागा होतो. आला कंटाळा तर कधीतरी जांभई देतो. परवा त्याने एक जांभई दिली-सत्ताधारी आमदार पुन्हा आमच्याकडे येणार आहेत! पुन्हा गप्प. जनतेला उपयोग काय? 22 महिन्यांचा हिशोब तुम्ही द्या!
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था पिसारा झडलेल्या मोरासारखी झाली आहे. ‘आम्ही 15 वर्षे शहराला स्मार्ट सिटी बनविले’ अशाच स्मरणरंजनात अजूनही हा मोर आहे. दुसरा भाजप? राजहंस असावा, नीरक्षीरविवेकाने कारभार करेल असे म्हणून त्याला निवडला, तर तो काहीही खातो. त्याची शुभ्रता निघून गेली आहे. सगळे कसे स्वान्तसुखाय! महापालिकेची एकहाती सत्ता मिळून 22 महिने झाले. आता या 22 महिन्यांत काय काय केले याचा हिशोब दोघांनाही द्यावा लागेल. दुु:खी झाला की, शहामृग जमिनीत तोंड खुपसून राहतो, असे सांगितले जाते. मात्र, महापालिका निवडणुकीतील पराभवाने चक्क मोरानेच तोंड खुपसून घेतले. अजूनही ते बाहेर काढलेले नाही. शरद पवार, अजित पवार आले की, त्यांच्यासमोर भाषणे नेहमीच्याच पठडीत केली जातात. आणि समारोप करताना आवर्जून गळा काढला जातो-आम्ही शहर कसे ठेवले होते, किती बक्षीसे मिळाली होती, किती मोठा विकास केला… इत्यादी इत्यादी. नेते गेले की झाले. पुन्हा ये रे माझ्या मागल्या! मग कधीतरी पत्रके काढायची जयंती, मयंतीची. त्यावर उपस्थितांची नावे आणि फोटोतील लोक तेच तेच.
![](https://janshakti.online/new/wp-content/uploads/2018/12/image-5-10.jpg)
हे देखील वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसने शहरावर राज्य केले होते असे वाटतच नाही. विरोधात असले तरी राज्य करता येते याची त्यांना जाणीवच नसल्याने सत्ताधारी बेलगाम झाले आहेत. वास्तविक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्ता मिळवलीत ना? मग दाखवा आता ते खरे करून, असा खडसावून जाब विचारता आला असता. तशी संधी अनेकदा विविध कारणांवरून त्यांना आली होती. मात्र, एकजुटीच्या ऐवजी वैयक्तिक प्रसिद्धीचे नगारे वाजविण्यात महापालिकेतील पदाधिकारी व शहर समितीचे पदाधिकारी मश्गुल आहेत. काहीजण तर 10-10, 20-20 वर्षे फक्त निवडूनच येताहेत. हा अनुभव केवळ स्वत:ला ज्येष्ठ म्हणवून घेण्यासाठीच आहे. कारभारात कोठे हे ज्येष्ठत्व कामी आले आहे असे दिसत नाही. सत्ताधार्यांना धारेवर धरण्याऐवजी आयुक्तांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाते. काय तर म्हणे, ‘आयुक्त भाजपचे घरगडी आहेत’, ‘आयुक्त भाजपचे प्रवक्ते आहेत’, ‘आयुक्त सत्ताधार्यांचे बाहुले आहेत.’ अरे मग परदेश दौर्यात त्यांच्याच हातात हात गुंफून सेल्फी कसे काय काढता? हा तर उघडपणे तुमचाही जुमला आहे. दौर्याच्या नावावर परदेशात अभ्यास दौरे काढणार्या, जनतेच्या पैशाने दहा दहा दिवस तिकडे मजा करणार्या सत्ताधार्यांवर सभेत हल्लाबोल करण्याऐवजी अशा दौर्यांमध्ये आमचीही नावे घाला हो, म्हणून लाळ घोटली जाते. याचमुळे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज घुमत नाही. सर्वांना सगळे माहित आहे.
महापालिकेत ही स्थिती, तर पक्षाच्या आंदोलनासाठी रस्त्यावर कोण उतरायला येत नाही. पक्षाच्या कार्यालयात कोण जमत नाही. जणूकाही ही कामे करण्याची जबाबदारी शहर कार्यकारिणीचीच आहे. नगरसेवक झाल्यामुळे रुबाब आला असून आता रस्त्यावर उतरायला त्यांना कसेतरीच वाटते आहे. राष्ट्रवादीच्या याच कुंभकर्णी अवतारामुळे भाजप बेलगाम झाली आहे. मोठमोठी आश्वासने देवून सत्ता मिळविली. मात्र, आश्वासने पूर्ण करण्याचा रेटा त्यांच्यामागे लावलेला नाही. उलट टेंभा मिरवत सांगितले जात आहे – भाजपचे शहरातील आमदार लक्ष्मण जगताप व महेश आमदार आणि एक माजी महापौर पुन्हा आमच्या पक्षात येत आहेत. अरेरेरे, कीव करावीशी वाटते. ‘वास्तविक तुम्ही गेलात तरी आमचे अडलेले नाही. आहात तिथेच सुखी रहा. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत आणि आम्ही निवडणूका जिंकणार आहोत’ असे ठणकावून सांगायला हवे होते. मात्र, गेलेल्यांसाठीच पायघड्या घातल्या जात आहेत. असे करून आपण त्यांचेच बळ वाढवत आहोत, याचाही ताळ कोणाला राहिलेला नाही. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते जर पुन्हा पक्षात आले तर तुमचे अस्तित्व राहिल का? त्यांनी पक्ष सोडणे ही संधी मानून काम करायला हवे होते. मात्र, मान तुकविलेलीच राहिली आहे.
सत्ता मिळाली याचा अर्थ ती पाच वर्षासाठीच आहे, याची जाणीव भाजपने ठेवायला पाहिजे. गेल्या 22 महिन्यांत तुम्ही कोणती अशी ठोस कामे केलीत की जनता कायम स्मरणात ठेवेल? पहिले बारा महिने सत्कार स्वीकारण्यात आणि राष्ट्रवादीने केलेल्या कामांची उद्घाटने व त्यांनीच घेतलेल्या कामांची भूमीपुजने करण्यात गेले. नंतर काहीही नाही. कचर्याच्या फेरनिविदा काढाव्या लागल्या, प्रत्येक कामात सल्लागार नियुक्ती धडाक्यात आहे, शिक्षक भरतीतही मोठा भाव फुटल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या काळातही हे होतच होते. परंतु, तुमच्याकडून त्यांच्यापेक्षा चांगल्या कामाची अपेक्षा होती. रेडझोन, शास्ती, अनधिकृत बांधकामे, बंद जलवाहिनी…याचे काय झाले पुढे. आम्ही प्रत्येक सभेत इतक्या कोटींच्या कामांना मंजुरी देतो, हे सांगण्याऐवजी राष्ट्रवादीपेक्षा कमी बजेटमध्ये जादा कामे केली का किंवा करत आहात? का सवाल आहे. दररोज प्रसिद्धीमाध्यमांमध्ये विविध प्रश्न, समस्या मांडल्या जातात. मात्र, त्याची कायमची सोडवणूक केली अशी किती कामे केली आहेत? अजून तुमच्याच नगरसेवकांच्या प्रभागातील टपर्या, हातगाड्यांचे रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत रिक्षा थांबे, बेकायदा वाहनतळ, उघड्यावर दारू विक्री, भर रस्त्यावर टेबल थाटून दारू प्राशन, हफ्तेवसुली, गुंडगिरीला आश्रय हेच थांबलेले नाही. हे एवढे जरी काम केले तर शहर स्वच्छ दिसू लागेल. शहर सौंदर्यीकरणासाठी स्वतंत्र निधीची गरज भासणार नाही. मटण-भाकरीचे ताजे जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण ते कॉम्प्युटरवर सुंदर केलेल्या चेहर्यांच्या नेत्यांच्या वाढदिवस! असे कितीतरी फलक हटविले तर चौक सुशोभित दिसतील. मग कोणत्याही स्पर्धेत भाग न घेतानाही आपोआप बक्षीसे मिळतील.
जवाब दो! विरोधक म्हणून खरोखरच किती प्रामाणिक भूमिका बजावली? कोणत्या विषयांवर अंकुश ठेवल्यामुळे सत्ताधार्यांनी बेकायदा कामे थांबविली? अशा कोणत्या प्रश्नावर रान उठविले की जनता खुश आहे? राष्ट्रवादीने हे सांगणे आवश्यक आहे. तसेच सत्ताधारी म्हणून आपण किती चांगले काम केले? कोणती विकास कामे केली? याची एकदा सविस्तर माहिती जनतसमोर कधी मांडणार आहात?