22 वर्ष हिंदू मुस्लिम एकत्र करतात गणेशोत्सव साजरा

0

घाटकोपर (निलेश मोरे) | समाजातील विविध जाती धर्मातील एकतेला टिकून ठेवण्यासाठी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली . एकतेच्या उद्देशाने सुरु केलेला हा उत्सव बघता बघता देश विदेशाच्या कानाकोपऱ्या पर्यंत जाऊन पोहोचला . श्री गणेशजी हे एकतेचे प्रतिक आहे . हिंदू मुस्लिम समाजात अनेकदा आपण दुफली निर्माण होताना पाहतो. इंटरनेट सारख्या जमान्यात आता ही दुफली कमी होताना दिसत आहे . एकतेचे प्रतिक मानला जाणारा हा उत्सव आता तर दहशतीचे वातावरण असणाऱ्या भारत पाक बॉर्डरवर देखील साजरा व्हायला लागला आहे . घाटकोपर पश्चिम नित्यानंद नगर येथील राम रहीम मित्र मंडळातील हिंदू मुस्लिम एकत्र येत गेली 22 वर्ष एकोप्याच्या भावनेने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करत आहे . या मंडळात 50 टक्के हिंदू आणि 50 टक्के मुस्लिम समाजातील लोक राहतात . मोहरम आणि गणेशोत्सव हे दोनच सण वर्षातून साजरे केले जातात . गणेशोत्सवात सकाळी आणि संध्याकाळी आरतीसाठी दोन्ही धर्मातील लोक मोठ्या आनंदाने सहभाग घेतात . गणेश जयंती ते गणेश विसर्जन असा दहा दिवस हा उत्सव येथे साजरा होतो .

राम रहीम मित्र मंडळाचे अध्यक्ष कासिम कुक्तबुद्दीन पठाण यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की गेली 22 वर्ष आम्ही येथे गेणेशोत्सव साजरा करतो . सण साजरे करताना आम्ही कधीच धर्म बघत नाही तर एकच धर्म पाळतो तो म्हणजे माणुसकीचा . प्रत्येक धर्मातील लोकांनी एकमेकांचे उत्सव साजरे केले पाहिजे . अशा उत्सवातूनच समाजातील हि एकता अखंडपणे टिकेल . गणेशोत्वसात आमच्या प्रत्येक सदस्यच्या घरात गोड पक्वान्न बनवले जातात . आमच्या मुस्लिम महिला मनोभावे श्री गणेशजीची आरती म्हणायला येतात . दहा दिवस आमच्या मंडळातील वातावरण अगदी अल्हादायक असते असे त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले .