पाच राज्यात गॅस कटरने एटीएम फोडून धुमाकूळ घालणारी हरीयाणातील टोळी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

शिंदखेड्यातील चोरीचा उलगडा ः अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता

धुळे/भुसावळ : शिंदखेडा शहरातील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून चोरट्यांनी 36 लाख 86 हजार 500 रुपयांची रोकड लांबवल्याची घटना 13 ते 14 नोव्हेंबरदरम्यान घडली होती. चोरट्यांनी सीसीटीव्हीत छबी कैद न होण्यासाठी कॅमेर्‍यांवर काळा स्प्रे मारला होता शिवाय तब्बल 36 तास उशिराने घटना उघडकीस आल्याने शिंदखेडा स्टेट बँक प्रशासनावर टिकेची झोडही उठली होती. या गुन्ह्याची धुळे स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली असून हरीयाणातील चौघा अट्टल चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या बांधल्या आहेत. आरोपी टोळीविरोधात तब्बल पाच राज्यात एटीएम फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आरोपींच्या ताब्यातून तीन लाखांची रोकड, महेंद्रा पिकअप व दुचाकीसह एकूण आठ लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकार परीषदेत या गुन्ह्याच्या उकल संदर्भात माहिती देत गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष कौतुक केले.

या आरोपींना झाली अटक
आबीद उर्फ लंगडा उर्फ बकरा अब्दुल अही (45, व्यवसायाने चालक, रा.ग्राम ओहोता, पुन्हाना, जि.नुहू, हरीयाणा), माहिर लियाकत अली (20, घोडावली, हथीन, जि.पलवल, हरीयाणा), ताहीर हुसेन इसरा खान (44, घोडावली, हथीन, जि.पलवल, हरीयाणा), संतोष तुलसीराम जमरे (32, पाडला, अंजड, जि.बडवाणी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील तीन संशयीत पसार असून त्यांचाही कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
चौघांच्या टोळीकडून गुन्ह्यातील तीन लाखांची रोकड, पाच लाख रुपये किंमतीची महेंद्रा पिकअप (एच.आर.61 ए.9116), दुचाकी (एम.पी.09 एम.आर.6252) तसेच दोन मोबाईल हॅण्डसेट मिळून आठ लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कुविख्यात टोळीविरोधात पाच राज्यात गुन्हे
अटकेतील कुविख्यात टोळीविरोधात राजस्थान, कर्नाटक, हरीयाणा, पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात एटीएम फोडल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अटकेतील आरोपींनी आणखी काही एटीएम फोडल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींना अधिक तपासासाठी शिंदखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, संजय सरग, कुणाल पानपाटील, योगेश चव्हाण, राहुल सानप, गौतम सपकाळे, सुनील पाटील, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, विशाल पाटील, मयूर पाटील, महेंद्र सपकाळ, तुषार पारधी, मनोज महाजन आदींच्या पथकाने उघडकीस आणला.