धुळे । अनुसुचित जाती (नवबौध्द घटकांसह) विमुक्त जाती, भटक्या जमाती
(धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील आणि सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होवून विवाह करणार्या जोडप्यांसाठी कन्यादान योजना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येते. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांनी केले आहे.
योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होवून विवाह करणार्या एका जोडप्यास 20 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वधूचे आई-वडील किंवा पालकांच्या नावे धनादेशाद्वारे विवाहाच्या दिवशी वितरीत करण्यात येते. सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे चार हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
योजनेच्या अटी व शर्ती अशा :
वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत. नवदाम्पत्यांपैकी वराचे वय 21 व वधूचे वय 18 पेक्षा कमी असू नये. सामूहिक विवाह सोहळ्याकरीता किमान दहा जोडपी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठीच आहे. मात्र, विधवा महिलेस दुसर्या विवाहासाठी सुध्दा अनुज्ञेय राहील. स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्तांकडे स्थानिक नोंदणी अधिनियम व
सार्वजनिक विश्वस्त अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असावी. तसेच अर्ज सादर करताना सदरहू नोंदणी प्रभावी असली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थेविरुध्द कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविलेला किंवा न्यायालयीन प्रकरण नसावे. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणार्या दाम्पत्यास देण्यात येणारे अनुदान त्यांच्या प्रथम विवाहासाठीच आहे याची खातरजमा करण्यासाठी त्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व शहरासाठी नगरसेवक/मुख्याधिकारी किंवा नागरी स्थानिक संस्थेने प्राधिकृत केलेल्या अधिकारी यापैकी दोघांचे प्रमाणपत्र आयोजकांनी प्रस्तावासोबत सादर करावे.
विवाह सोहळ्यात भाग घेणार्या दाम्पत्यास जात प्रमाणपत्राची पडताळणी तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी या दर्जाच्या अधिकार्यांकडून करणे आवश्यक राहील. सेवाभावी संस्था, यंत्रणेने सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या जोडप्यांची माहिती विहीत नमुन्यातील अर्जात आवश्यक त्या कागदपत्रांसह विवाह संपन्न होण्याच्या किमान 30 दिवस अगोदर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, धुळे या कार्यालयाकडे सादर करावी. विवाह सोहळा स्वयंसेवी संस्थांबरोबर केंद्र, राज्य शासकीय स्वायत्त संस्था, शासकीय प्राधिकरणे, सार्वजनिक प्राधिकरणे/जिल्हा परिषद आदींना देखील आयोजित करता येईल.
प्रस्ताव 31 डिसेंबरपर्यंत सादर करा
सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यास इच्छुक असणार्या स्वयंसेवी संस्थांनी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, धुळे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, साक्री रोड, धुळे) यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधून सदर कार्यालयात उपलब्ध असलेले विहित परिशिष्ट अ, परिशिष्ट- ब, परिशिष्ट- क, परिशिष्ट- ड प्राप्त करून घ्यावेत व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव 31 डिसेंबर 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे.