जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून आलेल्या व्यवस्थापन प्रतिनिधीमधून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सतिश पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने केवळ महेश घुगरी यांचा एकमेव अर्ज राहिला आहे.
१८ नाव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम विद्यापीठाकडून जाहिर करण्यात आला होता. सोमवारी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी झाली. छाननी अंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.आर.एल.शिंदे यांनी जाहिर केली होती. त्यामध्ये महेश घुगरी (धुळे एज्युकेशन सोसायटी, धुळे) व सतीश पाटील (किसान विद्या प्रसारक संस्था, पारोळा) यांचा त्यामध्ये समावेश होता. रविवार दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. रविवारी सतिश पाटील यांनी अर्ज मागे घेतला त्यामुळे केवळ श्री घुगरी यांचा अर्ज आता राहिला असून दि.९ डिसेंबर रोजी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होईल.