प्रवाशांना मोठा दिलासा : चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर सोमवारपासून आठवड्यातून सहा दिवस धावणार मेमू

रविवारी मेमू बंद ; मेल एक्स्प्रच्या दराने होणार तिकीटाची आकारणी

भुसावळ : कोरोनामुळे 24 मार्च 2020 पासून चाळीसगाव पॅसेंजर बंद करण्यात आल्याने चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होते मात्र लोकप्रतिनिधी व प्रवाशांच्या सततच्या मागणीनंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गावर गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र पॅसेंजरऐवजी आठ डब्यांची मेमू गाडी धुळे-चाळीसगाव मार्गावर सोमवार, 13 डिसेंबरपासून धावणार आहे. दिवसातून दोन वेळा या गाडीच्या फेर्‍या होतील शिवाय रविवारी मात्र मेमू बंद ठेवण्यात येणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन केल्यानंतरच या गाडीत प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, पॅसेंजरऐवजी धावणार्‍या मेमूगाडीसाठी मेल एक्स्प्रेसच्या दराने भाडे आकारणी होणार असल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे.

दिवसभरातून दोन फेर्‍या होणार
मेमू गाडी क्रमांक 01303 ही चाळीसगाव येथून पहाटे 6.30 निघाल्यानंतर धुळ्यात 7.35 वाजता पोहोचणार आहे तर मेमू गाडी क्रमांक 01313 सायंकाळी 5.30 वाजता चाळीसगाव येथून सुटल्यानंतर 6.35 वाजता धुळ्यात पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात धुळे येथून गाडी क्रमांक 01304 सकाळी 7.50 वाजता सुटल्यानंतर सकाळी 8.55 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे तसेच गाडी क्रमांक 01314 धुळे येथून सायंकाळी 7.20 वाजता सुटल्यानंतर रात्री 8.25 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे.

खासदारांनी केला होता पाठपुरावा
चाळीसगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी पॅसेंजर गाडी सुरू करण्यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता शिवाय प्रवाशांसह प्रवासी संघटनांनीदेखील वेळोवेळी या संदर्भात मागणी लावून धरली होती. अखेर मागणीला यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा
पहिल्या लॉकडाऊनपासून बंद असलेल्या या पॅसेंजरमुळे चाळीसगाव व धुळे येथे ये-जा करणार्‍या व्यावसायीक, मजूर,कामगार या सर्वांना पर्यायी दुसर्‍या साधनाने तडजोड करावी लागत होती शिवाय ही बाब खर्चिकही ठरत होती. धुळे-चाळीसगाव मार्गावर एकही एक्स्प्रेस अथवा पॅसेंजर सुरू नसल्याने सातत्याने पॅसेंजर सुरू करण्याची मागणी होत होती. गोरगरीब, मध्यमवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी व सुरक्षित प्रवास म्हणून या रेल्वे वाहतुकीकडे पाहिले जाते. सोमवार, 13 डिसेंबरपासून मेमू गाडी सुरू करण्याचा निर्णय झाल्याने चाकरमान्यांसह सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.