जळगाव : महापालिकेने मालमत्ताधारकांकडून थकबाकी वसुलीसाठी अभय योजना जाहीर केली असून या योजनेअंतर्गंत दि.१४ डिसेंबरपर्यंत थकित मालमत्ताकरण भरणाऱ्या थकबाकीदारांना शास्तीच्या (दंडाच्या) रक्केवर ९० टक्के सुट देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे ९० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी मंगळवारी मलमत्ताधारकांनी गर्दी केली होती. दिवसभरात तब्बल १ कोटी ५६ लाख ९५ हजार ९५६ रुपये इतका भरणा मालमत्ताधारकांनी केला आहे.

महापालिकेने शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी अभय योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गंत मालमत्ताकराची थकबाकी भरल्यास त्यावर सवलत देण्यात येणार आहे. दि.१५ नोव्हेंबर ते दि.१४ डिसेंबरपर्यंत थकबाकी भरल्यास ९० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. या सवलतीचा शेवटच्या दिवशी मोठ्याप्रमाणात मालमत्ताधारकांनी थकबाकीचा भरणा केला असून दिवसभरात १ कोटी ५६ लाख ९५ हजार ९५६ रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून ९० टक्के सवलतीला मुदत वाढ देण्यात आली असून दि.२१ डिसेंबरपर्यंत मालमत्ताकराची थकबाकी भरल्यास त्या मालमत्ताधारकांना ९० टक्के शास्ती(दंड) माफ करण्यात येणार आहे. तसेच दि.२२ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२२ दरम्यान थकबाकीचा भरणा केल्यास ७५ टक्के शास्ती माफ केली जाणार असून दि.६ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान, थकबाकी भरल्यास ५० टक्के शास्ती माफ केली जाणार आहे.

 

 

६ कोटी ७५ लाखांची वसुली

महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेचा सात ते आठ हजार नागरिकांना लाभ मिळाला असून ६ कोटी ७५ लाख ६८ हजार १६७ रुपये इतका भरणा झाला आहे. यामध्ये प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये १ कोटी ७९ लाख ५५ हजार ०४२ रुपये इतकी वसुली झाली असून प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये १ कोटी ८४ लाख ९४ हजार २१६ रुपये तर, प्रभागा समिती क्रमांक ३ मधून १ कोटी ८३ लाख २२ हजार ३४० रुपयांची व प्रभाग समिती क्रमांक ४ मधून १ कोटी २७ लाख ९६ हजार ५६९ रुपये इतकी वसुली झाली आहे.