नंदुरबार जिल्ह्यातील गावठाणांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण

पहिल्या टप्प्यासाठी अक्कलकुवा तालुक्याची निवड

नंदुरबार, : जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्वाती लोंढे यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यातील सर्व गावांच्या गावठाणाचे सर्वेक्षण ड्रोन कॅमेर्‍याद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात गावठाण भूमापन न झालेल्या सर्व गावांचे गावठाण भूमापनाचे काम ड्रोनच्या साह्याने केले जाणार आहे. यासाठी अत्याधुनिक जीआयएस प्रणालीच्या आधारे गावांच्या गावठाणातील मिळकतीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून सर्वेक्षण झाल्यानंतर संगणीकृत नकाशे मिळकत पत्रिका तयार होईल.

या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण, मिळकतींचा नकाशा व सीमा निश्चित होतील. तसेच मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे त्याचीही नोंद होईल. ग्रामस्थाच्या नागरी हक्काचे संरक्षण होईल. गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल. या सर्वेक्षणामुळे ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख व नकाशे उपलब्ध होणार आहेत.
या योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गावांचे ड्रोनद्वारे गावठाण भूमापन मोजणीचे काम प्रत्यक्षपणे सुरु करण्यात येईल.