जळगाव शहर महानगरपालिकेच्या बुधवारच्या महासभेत झालेला तुफान राडा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. यावेळी राष्ट्रगीताचा अपमान केला म्हणून नगरसेवक कैलास सोनवणे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यात धराधरी झाली. मात्र, हा सगळा प्रकार घडला यामागे खरे कारण काय ? हे जाणून घ्यायचा हा एक छोटासा प्रयत्न.
जळगाव शहराचा सर्वांगीण विकास खरे पाहता आजवर कधीच झालेला नाही. शिवसेना जरी म्हणत असली, की आम्हाला शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे तरी ते होणे शक्य दिसत नाही. कारण, जर खरंच शिवसेनेला शहराचा विकास करायचा असता तर भाजापातून आयात केलेले नगरसेवक पुन्हा स्वगृही गेले नसते. तसेच जळगाव शहराचा विकास करण्यासाठी म्हणून जर शिवसेनेचा महापौर बसला आहे, तर भाजपाचे बंडखोर नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी माजी महापौर तथा शिवसेनेचे प्रभावी नेते नितीन लढ्ढा यांच्यावर आरोप लावले नसते, की जळगाव शहरात जर बुलेट ट्रेन आली तर ती फक्त प्रभाग क्रमांक 5 मध्येच येईल. काल बंडखोरांनी हाच धागा पकडून महासभेत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण शिवसेनेचे नगरसेवक बंटी (अनंत) जोशी यांनी जिल्हाधिकारी यांचे नाव पुढे करत बंडखोरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आश्चर्याची बाब म्हणजे कैलास सोनवणे यांनी देखील महासभेत नितीन लढ्ढा यांचे समर्थन केले. प्रभाग क्रमांक 5 शहराचा मुख्य भाग आहे म्हणून तिथे काम झाले पाहिजे, असे ते म्हणाले. थोडक्यात 48 कोटी रुपयांपैकी मोठा वाटा हा केवळ जळगाव शहरातील मुख्य परिसराच्या विकासावरच खर्च होणार हे महासभेतच अधोरेखित झाले पण यातून पुढचा प्रश्न असा निर्माण झाला आहे, की 48 कोटी खर्च केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीकडून 52 कोटी रुपये शहराच्या विकासकामांसाठी मिळणार आहेत पण हाही निधी जर ठराविक प्रभागांतच खर्च होणार असेल तर कालच्यापेक्षा अधिक गोंधळ होऊ शकतो हे दुर्लक्षित करता येत नाही.
उपमहापौरांना विरोध हेच खरे कारण
जळगाव महापलिकेच्या महासभेत जी खडाजंगी झाली ती 5 कोटींच्या निविदेमुळे झाली. हा निधी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये खर्चिला जाणार आहे. त्याला भाजपाने हरकत घेतली. ठराविक प्रभागात विकासकामे होण्याऐवजी ती शहराच्या वेगवेगळ्या प्रभागात झाली पाहिजेत आणि त्यासाठी मनपा फंडातून तरतूद करायला हवी, अशी भूमिका घेतली. भाजपाची ही भूमिका शहराचा सर्वांगीण विकास या सूत्राशी साधर्म्य साधणारी असली, तरी त्या आडून उपमहापौर कुलभूषण पाटील यांना विरोध ही देखील एक खेळी असावी, असे दिसत आहे. कुलभूषण पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांच्याविरुद्ध निदर्शने करताना भाजपा कार्यालयातील दरवाजाला ज्याप्रकारे लाथ मारली होती आता कुलभूषण पाटील यांना महागात पडत आहे, असेही महापालिका वर्तुळात म्हटले जात आहे. हे जर खरे असेल तर यापुढे कुलभूषण पाटील विरुद्ध भाजपा, असा सामना नक्कीच रंगात येणार हे पक्के आहे. कालच्या महासभेतील राड्यानंतरही कुलभूषण पाटील यांनी मारामारी करणे हा माझा धंदाच आहे, असेच म्हणत राहिले तर त्यांचे राजकीय भविष्य कसे असेल ? हे कोणी सांगायला नको.
शिवसेनेमध्ये अंतर्गत राजकारण?
कालच्या राड्यानंतर जळगाव महानगर शिवसेनेत सुरू काय आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. भाजपातील बंडखोरांच्या मदतीने महापालिकेत सत्ता आल्यापासून शिवसेनेतील समीकरणे बदलू लागली आहेत. शिवसेनेच्या महापालिका वर्तुळातील दोन पक्के मित्र आता एकमेकांची स्तुती करायलादेखील तयार नाहीत. बंडखोरांपैकी कुलभूषण पाटील उपमहापौर झाल्यामुळे त्यांच्याबद्दल शिवसेनेतील काही जुन्या नगरसेवकांना आसूया वाटत असावी का ? कारण, या नगरसेवकांच्या तुलनेत कुलभूषण पाटील अगदीच नवखे आहेत पण त्यांच्या पुढाकारामुळे महापालिकेत सत्ता परिवर्तन होऊन सूत्रे शिवसेनेच्या हातात आली आहेत. काल, जेव्हा कैलास सोनवणे हे शिवसेनेच्या उपमहापौरांना खाली येण्यासाठी आव्हान देत होते तेव्हा कैलास सोनवणे यांना शिवसेनेच्या कोणत्याही नगरसेवकाने ठोस विरोध दर्शविला नाही, केवळ आक्षेप घेण्याचे पोकळ काम केले. महासभेत सायंकाळी जेव्हा कुलभूषण पाटील आणि कैलास सोनवणे यांच्यात ‘धराधरी’चा जोरदार प्रयत्न झाला तेव्हा शिवसेना नगरसेवक कुलभूषण पाटील यांचा बचाव करण्याऐवजी कैलास सोनवणे यांना मागे खेचण्यात शिवसेनेच्या काही नगरसेवकांना रस होता. याऐवजी कुलभूषण पाटील व कैलास सोनवणे यांच्यात भिंत म्हणून कोणीही उभे ठाकले नाही. यामुळे शिवसेनेतला अंतर्गत वाद पुन्हा एकदा लोकांसमोर आला आहे. शिवसेनेत नक्की सुरू तरी काय आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चिन्मय जगताप
उपसंपादक जनशक्ती