। मुंबई ।
टीईटी घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक करण्यात आली. या प्रकरणात आता अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील तपासासाठी आता एक समिती स्थापन करण्यात आली आहे. शिक्षण विभाग आता सतर्क झाला असून याबाबत कडक कारवाई करण्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ट्विट करत दिले आहेत.
आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक असलेला आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
म्हाडाच्या पेपरफूटी प्रकरणात पोलिसांनी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख (रा. खराळवाडी, पिंपरी ), अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा,जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) यांना अटक केली होती. त्याननंतर सायबर पोलिसांना संशयीत आरोपी डॉ. प्रितिश देशमुख याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी 2020 मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेत अपात्र झालेल्या 40 हून अधिक विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे सापडली होती. तसेच डॉ. देशमुखच्या चौकशीमध्ये राज्य परीक्षा परिषदेच्या एका अतिवरिष्ठ अधिकार्याचे नाव पुढे आले होते. त्यानंतर संशयाची सुई राज्य परीक्षा परिषदेकडे वळली होती. दरम्यान सायबर पोलिसांनी सुपे यास गुरुवारी सकाळी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनंतर दिवसभर व रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सुपे यास पोलिसांनी अटक केली, त्यास वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दुजोरा दिला. सुपे याने शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन उमेदवारांना पास केल्याचा ठपका ठेवला आहे.