जळगाव जिल्हा परीषदेतील लाचखोर वरीष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

दोन लाख 30 हजारांची लाच मागणी भोवली ः लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ

भुसावळ : शिक्षण सेवकपदी नियुक्तीस मान्यता देण्याबाबतचा अनुकूल अहवाल देण्याच्या मोबदल्यात दोन लाख 30 हजारांची मागणी केल्याप्रकरणी जळगाव जिल्हा परीषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरीष्ठ लिपिक योगेश अशोक खोडपे (40, रा.ममता राणे नगर, वाघ नगर, जळगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लाच मागणी भोवली
जळगावातील 35 वर्षीय तक्रारदार यांचा लहान भाऊ जळगावच्या आर.आर.विद्यालयात 2014 पासून शिक्षक या पदावर विनाअनुदानीत तत्वावर कार्यरत आहे. त्यांचे विनाअनुदानीत तत्वावरुन अनुदानीत तत्वावर शिक्षण सेवकपदी नियुक्तीस मान्यता देण्याबाबतचा अनुकूल अहवाल तयार करून पाठविण्याच्या मोबदल्यात यातील लोकसेवकांनी तक्रारदार यांच्याकडे 12 फेब्रुवारी पंचांसमक्ष लाच मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली मात्र आरोपीला संशय आल्यानंतर त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र एसीबीला लाच मागणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी सकाळीच आरोपी योगेश खोडपे यांना अटक करण्यात आली. आरोपीविरोधात गुरुवारी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

जिल्हा परीषदेच्या वर्तुळात खळबळ
टेबलावर नोटांचे वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकावयचा नाही हा शासकीय कार्यालयात जणू अलिखीत नियम झाला आहे मात्र लाचखोरांविरोधात एसीबीने दंड थोपटले असून कुणीही शासकीय अधिकारी वा कर्मचारी तसेच खाजगी इसमामुर्फत कुठलेही शासकीय काम करण्यासाठी पैसे/लाच मागत असल्यास तातडीने अँटी करप्शन ब्युरो, जळगाव, अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव (दुरध्वनी क्रं. 0257-2235477, 8766412529, टोल फ्रि 1064) वर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीचे पेालिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हा परीषदेत लाचखोर वरीष्ठ लिपिकावर कारवाई झाल्यानंतर या प्रकारात कोण-कोण अधिकारी आणखी सहभागी आहेत हे पोलिस कोठडीतील चौकशीअंती स्पष्ट होणार असून भ्रष्ट अधिकार्‍यांच्या गोटात कारवाईने प्रचंड थरकाप उडाला आहे.