जळगाव : भांड्यांसह दागिन्यांनाही पॉलीश करून देण्याचा बहाणा करून अज्ञात दोन भामट्यांनी महिलेचे 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व कानातले टॉप्स लंपास केल्याची घटना मंगळवार, 28 डिसेंबर रोजी दुपारी मेहरूण येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
फसवणूक करणार्यांची टोळी कार्यरत
मेहरुण परीसरातील रेणूका हॉस्पिटलसमोर संगीता विजय सोनवणे (42) ह्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 28 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास महिला घरात काम करत असताना 40 ते 45 वयोगटातील अज्ञात दोन भामटे आले व त्यांनी तांब्यासह पितळी भांड्यांना पॉलिश करून देतो, असे सांगितल्यानंतर सोनवणे यांनी भांडे दिली तर त्यानंतर मंगळसूत्र व टॉप्सदेखील आम्ही पॉलीश करून देतो, असे संशयीतांनी सांगितल्यानंतर महिलेने गळ्यातील 12 हजार रुपये किंमतीचे दोन मंगळसुत्र आणि 16 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी आणि 12 हजाराचे कानतले टॉप्स असे एकूण 40 हजारांचा मुद्देमाल पॉलीश करण्यासाठी दिला. अज्ञात भामट्यांनी एका डब्यात सोन्याचे दागिने आणि हळद टाकून गॅसवर ठेवण्याचा बहाणा केला. तेव्हढ्यात हातचलाखी करून डाब्यातील दागिने काढून रीकामा डबा गॅसवर ठेवला आणि दहा मिनिटांनी डबा उघडा, असे सांगून दुचाकीवरून पळ कराढला. महिलेने डबा उघडल्यानंतर दागिने नसल्याचे उघड झाले. महिलेने तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दुपारी चार वाजता अज्ञात दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहे.