जामनेर। एका नराधमाने 6 वर्षीय मुलीला आपल्या घरात उचलून नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना शहरातील जुना बोदवड रोडवरील घरकुलमध्ये शुक्रवारी, 31 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. त्या नराधमाला पीडिताच्या नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला. कारवाईसाठी गेलेल्या पोलीस ताफ्यावर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यात दोन पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलीस गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांवर केलेली दगडफेक व गाडीच्या काचा फोडल्याबद्दल पोलिसांच्यावतीने जमावातील समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सविस्तर असे, घरी एकटीच असणार्या सहावर्षीय मुलीला आपल्या घरात उचलून नेऊन घरातील एका कोपर्यात पलंगाखाली लपवून अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केला. त्यामुळे मुलगी जोरजोरात रडू लागली. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने शेजारीच राहणार्या महिलांनी मुलीच्या आईस कळविले. तोपर्यंत शेजारील महिलांनी संशयित आरोपीच्या तावडीतून या चिमुकलीस सोडविले होते. त्यानंतर मुलीचे नातेवाईक संशयिताच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली.संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोपीस चांगलाच चोप दिल्याने तो किरकोळ जखमी झाला. यावेळी घटनास्थळी एकच गर्दी जमा झाली होती.
दोन पोलिसांना किरकोळ दुखापत
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे आपल्या सहकार्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपीस ताब्यात घेतले. यावेळी जमाव पांगवितांना जमावातील काही समाजकंटकांनी उलट पोलिसांवर दगडफेक केली. त्यात दोन पोलिसांना किरकोळ दुखापत झाली. पोलीस गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. त्यात पोलीस कर्मचारी अमोल घुगे आणि सोनुसिंग डोभाळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हाफीज बेग मेहमूद बेग (रा. घरकुल वसाहत, जुना बोदवड रोड) यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 363, 354, 342, 506 व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 नुसार कलम 8 व 12 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहे.