भुसावळ : दीपनगरातील 210 प्रकल्पात भंगार चोरी करताना दोघे संशयीत सुरक्षा रक्षकांना आढळले मात्र अधिकारी व सुरक्षा रक्षकांना पाहून चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना रविवार, 2 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघा चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर चोरट्यांची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
अधिकारी येताच दुचाकी सोडून चोरटे पसार
210 प्रकल्पाचे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी कुणाल लहू वाघोदे (दीपनगर, ता.भुसावळ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून आरोपी नशीरशहा जनाबशहा (फेकरी, ता.भुसावळ) व संजय रामचंद्र मुंदडा (झेडटीएस फेकरी शिवार, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वाघोद हे 2 रोजी ड्युटीवर असताना गॅस गोदामात चोरी होत असल्याची माहिती त्यांना सुरक्षा रक्षकांनी दिल्यानंतर त्यांनी ड्युटी अधिकारी राजेश हरी तळेले यांच्यासह धाव घेतली असता दोघे चोरटे दुचाकी (एम.एच.19 डी.ए.4740) सोडून पसार झाले तर घटनास्थळी सुमारे चार हजार रुपये किंमतीच्या अॅल्युमिनिअम केबल ट्रेसह अन्य साहित्य आढळले. मंगळवार, 4 रोजी याप्रकरणी दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.