सफाई कामगारांची भरती करा अन्यथा ….

जळगाव – महानगरपालिकेतील आरोग्य विभागात सफाई कामगारांची रिक्त असलेली ५२३ पदांची भरती न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा भाजपा बंडखोर नगरसेवक चेतन सनकत यांनी पत्रकार परिषदेत दिला.या बाबत मनपा आयुक्त दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अधिक माहिती अशी की ,
मनपा प्रशासकीय इमारतीतील १७व्या मजल्यावर उपमहापौरांच्या दालनात गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी बोलतांना नगरसेवक सनकत यांनी सफाई कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरणेबाबतचे पत्र २०१५ ते आजतागायत दडपून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. १९९७ मध्ये सफाई कर्मचार्‍यांच्या ५९५ पदांना मंजुरी मिळाली होती. त्यातील काही पद भरली गेली. आणि ५२३ पद रिक्त राहिलेत. भरती प्रक्रिया बंद झाल्यानंतर हे सर्व पद व्यपगत झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असल्याचेही सनकत यांनी सांगितले. २०१३ मध्ये पद भरण्यासंदर्भात महासभेत ठराव करण्यात आला होता. या ठरावानुसार प्रशासनाने मंजुरीसाठी न पाठवता शासनाकडून केवळ मार्गदर्शन मागविले होते. त्यामुळे या संदर्भात शासनाकडे तक्रार केल्यानंतर २०१४ मध्ये कामगारांची पदे पुर्नजिवीत करण्याबाबत प्रशासनाला पत्र आले होते. मात्र, प्रशासनाने हे पत्र दडपून ठेवल्याचा आरोप सनकत यांनी केला आहे.

मनपा प्रशासनाकडून दिशाभूल
सफाई कर्मचार्‍यांच्या पद भरतीबाबत मनपा प्रशासनाकडून दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे नगरविकास मंत्री, मागासवर्गीय आयोग यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही सनकत यांनी सांगितले.