टॉवर चौक ते भीलपूरा चौकीपर्यंत ३५ ओट्यांवर हातोडा
कारवाईदरम्यान वाद झाल्याने तणाव; पोलिसांनी घेतली धाव
जळगाव- रस्त्या रुंदीकरणासाठी नगररचना विभागाने मोजणी केल्यानंतर टॉवरचौक ते भीलपूरा चौकीपर्यंत सोमवारी मनपाकडूनअतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करण्यात आली. तब्बल ३५ अतिक्रमीत ओटे तोडण्यात आले. कारवाईदरम्यान मनपा पथक आणि दुकानदारांमध्ये वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी धाव घेवून वाद मिटवला.
शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी नगररचना विभाग आणि बांधकाम विभागाकडून मोजणी करण्यात आली. टॉवरचौक ते ममुराबाद रोडपर्यंत दोन्ही बाजुने मोजणी करण्यात आली. या मोजणीअंती दुकानदारांच्या ओट्यांसह काही इमारतधारकांनी तीन ते चार ङ्गूट रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे लक्षात आले. त्यामुळे सोमवारी अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई हाती घेण्यात आली.
कारवाईदरम्यान वाद
टॉवरचौक ते भीलपूरा चौकीपर्यंत सोमवारी अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी मनपा उपायुक्त शाम गोसावी, अधीक्षक इस्माईल शेख, नगररचना विभागाचे प्रसाद पुराणिक, बांधकाम विभागाचे मनिष अमृतकर, सुभाष मराठे, संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, जमील शेख यांच्यासह ३० जणांचे पथक सकाळी ११ वाजता शहर पोलीस चौकीजवळ पोहचले. जेसीबी आणि अन्य साहित्याच्या माध्यमातून कारवाईला सुरुवात केली. या कारवाईदरम्यान, काही दुकानदार आणि महापालिकेच्या पथकामध्ये वाद झाला होता. त्यामुळे काही काळ तणावदेखील निर्माण झाला होता.
शहर पोलीस ठाण्यासमोरची पाणीपोई जमीनदोस्त
महानगरपालिका आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहर पोलीस ठाण्यासमोर पक्के बांधकाम असलेली पाणपोई उभारण्यात आली होती. मात्र, शर्मा नामक व्यक्तीने पाणपोई वाहतुकीला अडथळा ठरत असल्याची तक्रार लोकशाहीदिनी केली होती. त्यामुळे सोमवारी मनपाच्या पथकाने जेसीबीच्या माध्यमातून ही पाणपोई जमीनदोस्त केली. अतिक्रमण निमुर्लनाच्या कारवाईची मोहीम सुरुच राहणार असल्याचे उपायुक्त गोसावी यांनी सांगितले.