तालुक्यातील कानळदा गावाजवळ कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार विकास लीलाधर चौधरी वय 52 रा आव्हाणे ता. जळगाव हे जखमी झाले आहे. 3 जानेवारी रोजी घडलेल्या या अपघातप्रकरणी सोमवारी कारचालक रविंद्र रामा कुंभार रा. अमळगाव ता. अमळनेर याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आव्हाणे येथील विकास चौधरी व त्यांची पत्नी वंदनाबाई हे दोघे जण 3 जानेवारी रोजी त्यांच्या एम.एच.19 ऐ.वाय 5816 या क्रमांकांच्या दुचाकीने चोपड्याकडे जात होते. यादरम्यान कानळदा गावाजवळ एम.एच.48 ए.टी. 1339 या क्रमांकाच्या कारने विकास चौधरी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विकास चौधरी यांच्या उजव्या पायाला, तसेच कमरेला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर कार सोडून चालक घटनास्थळाहून पसार झाला होता. याप्रकरणी जखमी विकास चौधरी यांच्या पत्नी वंदनाबाई चौधरी यांच्या तक्रारीवरुन कारचालक रविंद्र रामा कुंभार याच्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे