भुसावळातील भाजपा नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश : अपात्रता याचिकेवर आता 28 रोजी सुनावणी

भुसावळ : भुसावळातील नगरसेवक अपात्रता प्रकरणात शुक्रवार, 14 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी असलीतरी राष्ट्रवादीत गेलेल्या नगरसेवकांच्या वतीने वकीलांनी हजेरी लावत म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितल्याने या प्रकरणावर आता शुक्रवार, 28 रोजी सुनावणी होणार आहे.

28 रोजी होणार सुनावणी
पालिका 2016 च्या निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या 10 नगरसेवकांनी 17 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेवून पक्षांतर केले. या प्रकरणी भाजपच्या नगरसेविका पुष्पा बतरा यांनी 10 नगरसेवकांविरुध्द जिल्हाधिकार्‍यांकडे अपात्रता याचिका दाखल केली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी रमेश मकासरे, सविता रमेश मकासरे, प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, अ‍ॅड.बोधराज दगडू चौधरी, शोभा अरुण नेमाडे, किरण भागवत कोलते व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे या नऊ नगरसेवकांविरोधात नगरसेविका पुष्पा रमेशलाल बतरा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे 31 डिसेंबरला अपात्रता याचिका दाखल केली आहे. शुक्रवार, 14 रोजी सुनावणीची तारीख असल्याने नऊ नगरसेवकांनी अ‍ॅड.हरीष पाटील व अ‍ॅड.महेश भोकरीकर यांना वकीलपत्र दिले असून या प्रकरणात म्हणणे मांडण्यासाठी आता 28 तारीख देण्यात आली आहे.

भुसावळात हिवाळ्यात पेटला राजकीय आखाडा
माजी मंत्री खडसेंच्या नेतृत्वात ठेवून नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपाने अपात्रता याचिका दाखल केल्याने नगरसेवकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे विशेष आकस ठेवून ठरावीक नगरसेवकांविरोधातच अपात्रता याचिका दाखल झाल्याचीही चर्चा आहे त्यामुळे आगामी काळात माजी मंत्री खडसे काय पवित्रा घेवून भाजपाच्या या खेळीला उत्तर देतात हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.