काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक वादग्रत व्हिडियो संपूर्ण सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. ज्यात ते म्हणत आहेत कि, मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो.
मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता नाना पटोलेंच्या या व्हिडीओवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरुन आता भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा पुलावर अडकून पडल्यानंतर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता नाना पटोलेंच्या या वक्तव्यानंतर नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
“मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे….,” असे नाना पटोले या व्हायरल व्हिडीओमध्ये बोलत असताना दिसत आहेत.