धक्कादायक! नंदुरबार आगारातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यु ; आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त

 

नंदुरबार- येथील आगारातील दोन एसटी कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. एसटी महामंडळाकडून होत असलेल्या त्रासामुळे दोन्ही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी नंदुरबार बस स्थानकात एकत्र येऊन मयत कर्मचार्‍यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच मयत कर्मचाऱ्यांचा मृतदेह नंदुरबार आगार प्रमुख यांच्या कार्यालयात ठोस कारवाई होईपर्यंत उचलणार नसल्याचा इशारा  दिला. त्यामुळे नंदुरबार शहर पोलिसांनी तात्काळ नंदुरबार बस स्थानकात पोलीस बंदोबस्त तैनात केला.

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आपल्या मागणीवर संपकरी कर्मचारी ठाम असून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू न झाल्यास एसटी महामंडळाकडून नोटिसा बजावण्यात येत आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी कारवाईच्या धास्तीने काही कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली असून काही कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात बलिदान दिल्याचे एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. लालपरीची चाके बंद असून संप सुरू असल्याने नंदुरबार आगारातील दोन एसटी कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराने  मृत्यू मंगळवारी दि.18 जानेवारी 2022 रोजी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या जाचक कारवाईमुळे दोन्ही एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून केला जात असून दुखवटा व्यक्त करण्यात येत आहे. नंदुरबार आगारातील कंडक्टर युवराज सुका भिल (वय 52) व चालक अनिल चौरे वाघाळेकर (वय 45) या दोन कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराने मंगळवारी मृत्यू झाला. हा मृत्यू एसटी महामंडळाच्या जाचक कारवाईमुळे झाल्याचा आरोप करीत दुखवटा म्हणून नंदुरबार आगारात कर्मचाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी तात्काळ दाखल होत संपकरी कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत समजूत काढण्यात आली. परंतु मयत कर्मचारी मृत्यूप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम असून दोन एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने तीव्र निषेध नोंदविला भावनाही व्यक्त केले आहे.