जळगाव – कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नैतिकता हरपली असून यामुळे त्यांनी पंतप्रधानांबाबत बेताल वक्तव्य केले आहे. यासाठी त्यांना अटक झाली पाहिजे. आणि जो पर्यंत त्यांना अटक होत नाही तो पर्यंत आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करत राहू असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी केले.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. भाजपच्या जिल्हा कार्यालयातून टॉवर चौकापर्यंत नाना पाटोले यांच्या निषेधाच्या घोषणा देत रॅली काढण्यात आली. रॅली टॉवर चौकात येताच कॉंग्रेस व नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या पोस्टरला शेण फासून पटोले यांना प्रतीकात्मक शेण खाऊ घातले. याच बरोबर जोडा मारो आंदोलन करत पोस्टरचे दहन केले.
याप्रसंगी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि.प. सदस्य मधुकर काटे, महिला आघाडीच्या दीप्ती चिरमाडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारला सत्तेचा माज आला आहे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले म्हणून राज्यशासनाने अटक केली होती मात्र नाना पाटोले यांना ते अटक करत नाहीयेत कारण महाविकास आघाडीला सत्तेचा माज चढला आहे.