भुसावळ । शहरातील आयुध निर्माणीपासून झेडटीसीला जोडणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग तयार केला आहे. मात्र, अद्यापही इटारसी लाइन वरील बोगद्याचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे रेल्वे फाटक बंद असल्याने वाहन धारकांच्या १५ मिनिटांचा खोळंबा होतो.फेकरी, दीपनगर, झेडटीसी भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी व शहरातून या भागात जाण्यासाठी रेल्वे गेट ओलांडावे लागते. मात्र, वारंवार गेट बंद असल्याने थांबण्याची वेळ येते. यामुळे अनेक वाहनधारक महामार्गावरुन फेऱ्याने ये-जा करणे पसंत करतात.
शहरातील आयुध निर्माणीपासून फेकरी व झेडटीसीला जोडणाऱ्या मार्गावर इटारसी मेन रेल्वे लाइन व दोन कॉडलाइन ओलांडून जावे लागते. या ठिकाणी सन २०१८ मध्ये भुयारी मार्गाचे काम रेल्वेने सुरु केले. २०१९ पर्यंत दोन्ही कॉड लाइनवर भुयारी मार्ग पूर्ण झाला. पण, तांत्रिक अडचणींमुळे इटारसी कडील म्हणजेच उत्तर भारताला जोडणाऱ्या मुख्य लाइन वरील भुयारी बोगद्याचे काम रखडले आहे. यामुळे इटारसी रेल्वे लाइन ओलांडून जावे लागते. त्यात अनेकवेळा रेल्वे गेट बंद असल्याने नागरिकांना १० ते १५ मिनिटे थांबून राहावे लागते.