धक्कादायक : चोरट्यांनी धरणगावातून 25 क्विंटल कापूस चोरला 

धरणगाव : धरणगाव-जळगाव रोडवर असलेल्या एका कापसाच्या जिनिंग कंपतीतून अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत तोडून 25 क्विंटल कापूस चोरून नेला. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला जात आहे.

चोरट्यांची आता पांढर्‍या सोन्याकडे नजर
धरणगाव जळगाव रोडवर महाविर कॉटन नावाच्या कंपनीत कापूस खरेदी-विक्री केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करून साठा करण्यात आला आहे. रविवार, 23 जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत फोडून सुमारे दोन लाख 37 हजार रुपये किंमतीचा 25 क्विंटल कापूस चोरून नेला. हा प्रकार सोमवार, 24 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. कंपनीचे मालक सुभाष काशीनाथ पाटील यांचा मुलगा देवा पाटील यांनी धरणगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांची घटनास्थळी धाव
धरणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्यासह गजानन पाटील, संदीप पाटील, जितेंद्र भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चोरी झाल्याचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात देवा पाटील यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. संरक्षण भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी वाहनाच्या मदतीने हा कापूस चोरून नेला आहे. धरणगाव पोलिस कर्मचारी हे कसून चौकशी करत आहे. या परीसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचे काम सुरू आहे.