जळगाव – डी.एन. कॉलेजजवळील दत्त नगर परिसरात मध्यरात्री घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले आहे. बंद घरातून सोने व चांदीच्या दागिने, रोकडसह लॅपटॉप व मोबाईल असा एकुण १ लाख ९१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सविता यतीन पाटील (वय-३०) रा. सुनंदीन पार्क, दत्त नगर, डी.एन. कॉलेज जळगाव ह्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २२ जानेवारी महिला व तिचे कुटुंबिय कामानिमित घर बंद करून बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर असल्याचे पाहून घरच्या वरच्या मजल्यावर जावून दरवाजाची आतील कडी आरशात पाहून उघडली. घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, १५ हजाराची रोकड, मोबाईल आणि लॅपटॉप असा एकुण १ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार २४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. सविता पाटील या घरी आल्यानंतर चोरट्यांनी चोरी केल्याचे समजल्यावर त्यांनी शनीपेठ पोलीस धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहे.
लाखोंचा ऐवज चोरीला
या घटनेमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला गेल्या असल्याचे सविता यतीन पाटील यांचे म्हणणे आहे. ज्या मध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, १५ हजाराची रोकड, मोबाईल आणि लॅपटॉप असा एकुण १ लाख ९१ हजाराचा मुद्देमालाच समावेश आहे.