नंदुरबार ( प्रतिनिधी )
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी लखनौ येथून एका व्यक्तीला अटक केल्यानंतर नंदुरबार , धुळे जिल्ह्यातील एजंटांची झोप उडाली आहे. पुणे पोलिसांचे पथक कधीही नंदुरबार ला येऊन झडप घालतील या भीतीने काही एजंट गाव सोडून पसार झाले तर काही जण नॉटरीचेबल असल्याची चर्चा जिल्हाभरात होऊ लागली आहे.
टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी परीक्षा मंडळाचे आयुक्त तुकाराम सुपे , माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आल्याने त्यांच्याकडून नंदुरबार जिल्ह्यातील एजंटांची माहिती घेतली जाते आहे. तुकाराम सुपे यांच्या एजंटांनी जमवलेल्या मायातून तालुक्यात गुंतवणूक केली आहे का ,याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे बहुचर्चित शिंदगव्हाण व रजाळे येथील कथित एजंटांच्या नातेवाईकांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी नामक व्यक्तीला अटक केली आहे. दुबईला जाण्यासाठी व्हिसा मिळाल्यानंतर तो देश सोडणार होता.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांच्या अटकेनंतर त्रिपाठी यांना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे व्यवस्थापक अश्विनी कुमार यांनाही अटक केली आहे. ज्यांना राज्य परीक्षा परिषद कार्यालयाने 2018 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले होते. या कंपनीचे मुख्य कार्यालय कर्नाटकात येथे आहे, तर तिच्या शाखा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आहेत.
या संदर्भात पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे सायबर शाखेतील पथकाचे कौतुक केले आहे. सुखदेव डेरे आणि अश्विनी कुमार हे निकाल प्रकाशित करण्याची जबाबदारी सांभाळत होते. याचा फायदा घेत एजंटांनी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात देखील याचे धागेदोरे असल्याने त्याची बारकाईने माहिती घेतली जात आहे. त्यामुळे या भागातील एजंट आणि त्यांनी नातेवाईकांच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणूकीवर कारवाई ची टांगती तलवार आहे.