जळगाव : शहरातील शेकडो मालमत्ताधारकांनी महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडविल्याचे समोर आले आहे. मनपाने २०१७-१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली असून संबधित मालमत्ताधारकांना फेरमुल्यांकनाच्या नोटीस पाठवून आता नवीन आकारणी करण्यात आली आहे.
महानरगपालिकेने २०१७-१८ मध्ये फेरमुल्यांकनासाठी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जळगाव शहरातील शेकडो मालमत्ताधारकांनी यापुर्वी आपल्या मालमत्तांचे क्षेत्रफळ कमी दाखविल्याचे समोर आले आहे. क्षेत्रफळ कमी दाखविल्यामुळे मालमत्ता कर देखील त्यांना कमी आकारण्यात आला होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या कोट्यावधी रुपयांचा कर बुडाला आहे. मात्र, नवीन सर्वेक्षणात त्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचे काटेकोरपणे मोजमाप झाल्याने आता त्यांना जेव्हढे क्षेत्रफळ तेवढ्या प्रमाणात कर भरावा लागणार आहे. त्यामुळे अनेक जणांकडून मालमत्ता करात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याची ओरढ केली जात आहे.
अनेकांनी दाखविला रहिवास
शहरातील अनेकांकडून आपल्या मालमत्ताचा व्यावसायीक वापर केला जात आहे. मात्र, असे असतांना देखील त्यांच्याकडून आपल्या मालमत्तामध्ये रहिवास असल्याचे दाखविण्यात आले होते. यामुळे देखील मनपाचा कर बुडत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले होते.
मालमत्ताचे मजले वाढले ; कर होता तेव्हढाच
शहरातील बहुतांश मालमत्ताधारकांनी गेल्या १५ वर्षांत आपल्या मालमत्तामध्ये वाढीव बांधकामे केली आहेत. आधी एक मजला होता त्यानंतर मालमत्ताधारकांनी त्यावर पुन्हा बांधकाम करुन दोन मजले तीन मजले वाढविले होते. मात्र, असे असतांना संबधित मालमत्ताधारकांकडून फक्त एकाच मजल्याचा कर मनपाला भरला जात होता अशी अनेक प्रकरणे फेरमुल्यांनाच्या सर्वेमधून समोर आली आहेत.