मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी सशक्त अभिनयाने भूमिका ‘अजरामर’ करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1926 रोजी अमरावती येथे झाला. देव यांचे आजोबा अभियंता होते. त्यांनी राजस्थानातील जोधपूर पॅलेसच्या उभारणीत मोठे योगदान दिले होते. कोल्हापूर शहराच्या उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी देव यांच्या आजोबांना निमंत्रित केले होते. त्यामुळे देव कुटुंब कोल्हापूरात स्थायिक झाले होते. रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांचे कायदेशीर सल्लागार होते. रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. 1951 मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘पाटलाची पोर’ या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. 1956 मध्ये राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खर्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राजश्री प्रोडक्शनच्या 1962 मध्ये आलेल्या ‘आरती’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. त्यांच्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या होत्या.
रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले होते. त्यातही पत्नी सीमा देव यांच्यासोबतचे सर्वच चित्रपट अतिशय हिटही झाले होते. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटात सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले. 1962 मध्ये त्यांनी ‘वरदक्षिणा’ या चित्रपटात सोबत काम केले. या चित्रपटावेळीच दोघांचे एकमेकांवर प्रेम जुळले होते. त्यानंतर उशीर न लावता ते त्याचवर्षी विवाहाच्या बंधनात बांधले गेले. 2013 मध्ये या जोडीच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली. रमेश देव आणि सीमा देव यांचे यंदा लग्नाचे 60 वे वर्षे होते. त्यांच्या मुलांचे नाव अजिंक्य आणि अभिनय असे आहे. रमेश देव यांनी आतापर्यंत 280 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ अतिशय दर्जेदार गाजविला. राजश्री प्रॉडक्शनचा ‘आरती’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. आपल्या चित्रपटांच्या कारकिर्दीत त्यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या अभिनेत्यांसोबत काम केले. रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक होते. ते 1971 मध्ये ‘आनंद’ आणि ‘तकदीर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखले जातात.
2013 साली रमेश देव यांना अकराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘जीवन गौरव’ (लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड) पुरस्काराने सन्मानित केले होते. पाटलाचं पोर, सुवासिनी, झेप, अपराध, सर्जा, या सुखांनो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, तीन बहुरानियाँ असे त्यांचे अनेक गाजलेले चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. याशिवाय अनेक नाटके आणि मालिकांमधूनही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. 2006 मध्ये आलेल्या ‘निवडुंग’ मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती.
रमेश देव यांच्या गाजलेल्या सिनेमांमध्ये आझाद देश के गुलाम, घराना, सोने पे सुहागा, गोरा, मिस्टर इंडया, कुदरत का कानून, दिलजला, शेर शिवाजी, प्यार किया है प्यार करेंगे, इज्जाम, पत्थर दिल, हम नौजवान, कर्मयुद्ध, गृहस्थी, मैं आवारा हूँ, तकदीर, श्रीमान श्रीमती, दौलत, अशांती, हथकड़ी, खुद्दार, दहशत, बॉम्बे ऐट नाइट, हिरालाल पन्नालाल, यही है जिंदगी, फकीरा, आखिरी दाव, सुनहरा संसार, जमीर, एक महल हो सपनों का, सलाखें, 36 घंटे, प्रेम नगर, गीता मेरा नाम, कोरा कागज, कसोटी, जैसे को तैसा, जमीन आसमान, जोरू का गुलाम, बंसी बिरजू, यह गुलिस्ताँ हमारा, हलचल, मेरे अपने, संजोग, बनफूल, आनंद, दर्पण, खिलौना, जीवन मृत्यू, शिकार, सरस्वतीचंद्र, मेहरबान आदी चित्रपटांचा समावेश होता. त्यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली होती. त्यांनी ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘भाग्य लक्ष्मी’ या चित्रपटात काम केले. त्यांनी ‘दस लाख’ (1966) चित्रपटात ‘मनोहर’ची भूमिका साकारली होती. त्यांना ‘मुजर्मी’, ‘खिलोना’ आणि ‘जीवन मृत्यू’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ‘कोरा कागज’ आणि ‘आखा दाव’ चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी ‘खुशी-दर’ (1982) चित्रपटात ‘रामनाथन’ची भूमिका साकारली होती. त्यांचे पुढचे चित्रपट ‘औलाद’ आणि ‘घायल’ होते. त्यांनी कौल साहबच्या भूमिकेत 2013 मध्ये ‘जॉली एलएलबी’ चित्रपटात काम केले होते. 2016 मध्ये त्यांनी ‘घायल वन्स अगेन’ चित्रपटातही काम केले होते.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षांचे होते. गेल्या चारच दिवसांपूर्वी 30 जानेवारी रोजी त्यांनी आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशा मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी गाजविणार्या महान अभिनेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली…!
-शरद भालेराव,
उपसंपादक जळगाव.
Prev Post