संरक्षण खात्याच्या बनावट कागदपत्रांद्वारे हरीयाणातील दारूची वाहतूक : धुळ्यात एक कोटी 40 लाखांच्या मुद्देमालासह दोघे जाळ्यात
धुळे स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई : टोळी जाळ्यात अडकण्याची शक्यता
भुसावळ/धुळे : संरक्षण खात्याच्या बनावट दस्तावेजाद्वारे हरीयाणात निर्मित व तेथेच विक्रीची परवानगी असलेली तब्बल एक कोटी 40 लाखांची दारू धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी मोहाडी नगर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मोहाडी टोल नाक्याजवळ कलकत्ता-पंजाब ढाब्याजवळील मोकळ्या पटांगणात कंटेनर (आर.जे.14 जी.एफ.9446) हा उभा असताना पथकाने त्याची झडती घेतल्यानंतर त्यात मद्यसाठा आढळला. पथकाने संशयीत दीपक धरमविर सिंग (27, उदयपूर, राजस्थान) व मोहम्मद दानीश मोहम्मद गौस (22, प्रतापगढ, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली असता आरोपींनी राजस्थानच्या मिल्ट्री कॅम्पमधून मद्यसाठा घेवून तो नाशिक येथे मिल्ट्री कॅम्प कॅन्टीनमध्ये नेत असल्याचे सांगत बिलही सादर केले मात्र चौकशीत हे बिल बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने दोघा आरोपींना अटक करण्यात आली.
एक कोटी 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
पथकाने 89 लाख 28 हजार रुपये किंमतीची मॅकडॉल व्हिस्की, 24 लाख 57 हजार रुपये किंमतीची रॉयल चॅलेंज व्हिस्की, सहा लाख 60 हजार रुपये किंमतीची ऑल सिजन व्हिस्की व 20 लाख रुपये किंमतीचा कंटेनर मिळून एक कोटी 40 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघा आरोपींविरोधात मोहाडी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, संतोष हिरे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, योगेश चव्हाण, मयूर पाटील, तुषार पारधी, सुनील पाटील, विलास पाटील व गुलाब पाटील यांच्या पथकाने केली.