भुसावळात एकाचवेळी तीन घरे फोडली

भुसावळ : शहरात जुन्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास थंडबस्त्यात असताना नव्याने होणार्‍या चोर्‍यांमुळे नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. शहरातील गजानन महाराज नगराजवळ एकाच वेळी चोरट्यांनी तीन घर फोडत चोरट्यांनी एका ठिकाणाहून दुचाकी लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नागरीक बाहेरगावी गेल्याने नेमका काय ऐवज चोरीला गेला? हे कळू शकले नाही. पोलिसांची गस्त नावालाच ठरत असल्याचा उघड आरोप नागरीक आता करीत आहेत.

अर्धा तास चोरट्यांचा धुमाकूळ
शहरातील कोटेच्या शाळेमागील बाजूला गजानन महाराज नगराच्या उत्तरेस असलेल्या परीसरात दोन घरांमधील सदस्य बाहेरगावी तर एका घरातील सदस्य घरात झोपले असतांना अपार्टमेंटखाली लावलेली मोटार सायकल चोरट्यांनी चोरून नेली तर एका क्लासचे कुलूपही तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला मात्र तेथे त्यांना काहीही रोकड सापडली नाही त्यामुळे संगणक, लॅपटॉप, प्रोजेक्टर तसेच सोडून चोरटे पसार झाले. प्रदीप चौधरी हे 3 फेब्रुवारीपासून पुण्याला गेल्याने चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत कपाटातील साहित्यांची फेकाफेक केली. चौधरी घरी नसल्याने नेमके काय चोरीला गेले याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

चोरट्यांनी दुचाकी लांबवली
पॅरॉडाईज अपार्टमेंटमधील रहिवासी उमेश पाटील यांची दुचाकी (एम.एच.19 बी.डी.5899) ही चोरट्यांनी लांबविल्याची बाब बुधवारी सकाळी उघड झाली. या परीसरातील शिक्षक भावेश जंगले हे क्लास घेतात. त्यांच्या घरात पहाटे 2.35 वाजता प्रवेश करून क्लास भरत असलेल्या रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला मात्र चोरट्यांच्या हाती रोकड न लागल्याने त्यांनी माघारी मोर्चा वळवला तर याच परीसरातील आरपीएफ कर्मचारी राजेश भिसे हे बाहेर गावी गेल्याने त्यांच्या बंद घराचे बाहेरील कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली मात्र नेमका काय ऐवज चोरीला गेला? हे कळू शकले नाही.

शहर पोलिसांची घटनास्थळी धाव
बुधवारी दुपारी चोरी झाल्याची माहिती समोर आल्यावर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण, सहायक पोलिस निरीक्षक विनोककुमार गोसावी, सहायक फौजदार सय्यद वली आदींनी भेट देऊन पाहणी केली. संबंधित घर मालक गावाहून आल्यावर नेमके काय चोरीला गेले हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सीसीटीव्हीत अडकले चोरटे
चोरटे शिक्षक जंगले यांच्याकडे आले त्यावेळी त्यांच्या बाजूला राहात असलेल्या रहिवाशांच्या घराच्या बाहेर सीसीटिव्ही लावण्यात आल्याने पहाटे 2.35 वाजता चार चोरटे तेथे आल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले असून शहर पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले. चोरटे कोण आहे, याची माहिती काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.