28 लाखांची चांदी जप्त : मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी

मुक्ताईनगर : साखर कारखाना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील घोडसगाव फाट्यावरील हॉटेलवर थांबलेल्या लक्झरी बसमधून तब्बल 40 किलोग्रॅम वजनाची 27 लाख 97 हजार पाचशे रुपये किंमतीची चांदीची बिस्किटे अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना 16 जूनच्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच 17 जून 2021 रोजी रात्री साडेबारा वाजता घडली होती. या प्रकरणी गोपाराम देवासी (24, मूळ रा.राजस्थान, हल्ली मुक्काम हिंगोली, महाराष्ट्र) याने मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा मुक्ताईनगर पोलिसांनी तपास करीत गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून इंदौर जिल्ह्यातील धारजवळील एका गावातून हा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरी प्रकरणी अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसलीतरी लवकरच आरोपींना अटक होईल, अशी माहिती निरीक्षक राहुल खताळ यांनी दिली.

जेवणासाठी खाली उतरताच लांबवली बॅग
गोपाराम देवासी यांचे मालक मनोज देवासी यांनी 15 जून 2021 रोजी फिर्यादीस 30 किलोग्रॅम चांदीची बिस्किटे इंदोर येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे गोपाराम देवासी हे 40 किलोग्रॅम चांदीची 27 लाख 97 हजार 500 रुपये किंमतीची बिस्किटे एका बॅगमध्ये घेऊन हिंगोली येथून रेल्वेने अकोला येथे निघाले. त्यानंतर अकोला येथून 16 जुन रोजी चांदीची बिस्किटे घेऊन गोपाराम देवासी हे रॉयलस्टार या अमरावती ते इंदोर लक्झरी बसमध्ये लोवर बर्थवरील सीट नंबर 27 वरून निघाले. त्यानंतर बस 17 रोजी रात्री 12.30 वाजता नागपूर-मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील घोडसगाव फाट्यावरील तिरंगा हॉटेलवर जेवणासाठी थांबली असताना गोपाल राम देवासी हे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. व पार्सल घेऊन आले असता त्यांची चांदीची बॅग त्यांच्या नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान फिर्यादी हे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेले असता त्याच कालावधीत दोन अज्ञात व्यक्ती त्यापैकी एक पांढरा शर्ट घातलेला अशा दोन व्यक्ती काहीतरी बॅग लक्झरी बसमधून नेल्याची शंका फिर्यादीस आल्याने त्याने तत्काळ हॉटेलचे मालक यांच्याशी संपर्क साधत घडलेली हकीकत सांगितली. व त्यानंतर तत्काळ मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मुक्ताईनगर पोलिसांनी खबर्‍यांचे नेटवर्क कामाला लावत चोरटे हे इंदौरच्या धारजवळील एका गावातील असल्याचे व त्यांची टोळी कार्यरत असल्याचा तपास लावला होता. पोलिसांनी या गावातून 40 किलो चांदी जप्त केली मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले मात्र आरोपींच्या मागावर पथक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, डीवायएसपी विवेक लावंड तसेच पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोलिस नाईक संतोष नागरे, पोलिस नाईक नितीन चौधरी, कांतीलाल केदारे, कॉन्स्टेबल सागर सावे, विशाल पवार आदींच्या पथकाने केली.