जळगाव : शहरातील शिवाजी नगरातील हातमजूरी करणार्या तरुणाच्या अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकी जाळल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताने जाळल्या दुचाकी
शहरातील शिवाजी नगरातील लाकुडपेठमधील गल्ली नंबर 2 मधील रहिवासी चंदन विलास पाटील हा तरुण हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. त्या तरुणाने सदाकेश घनश्याम लखवाणी (सिंधी कॉलनी) यांच्याकडून गेल्या पाच-सहा महिन्यांपुर्वी दुचाकी (एम.एच.19 ए.वाय.6090) व (एम.एच.19 डी.ई.3481) क्रमांकाच्या दोन दुचाकी विकत घेतल्या मात्र दुचाकी अद्याप त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत. त्या दुचाकींचा वापर चंदन व त्याचा भाऊ सागर हा कामावर जाण्या-येण्यासाठी करीत होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास चंदन याने आपल्या दोन्ही दुचाकी घरासमोर लावल्या असताना मध्यरात्री दीडवाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरुने त्यांच्या दुचाकी पेटवून दिल्या. परीसरातील नागरीकांनी तात्काळ पाणी टाकून जळत असलेल्या दुचाकी विझविल्या. याप्रकरणी चंदन पाटील याने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास संजय झाल्टे हे करीत आहे.