ग्राहक पंचायतीचा ब्लू स्टार कंपनीला दणका ग्राहकाला बदलून मिळाला एसी

शिंदखेडा। घरातील वातानुकूलित यंत्र (एसी) खराब झाल्याने वारंवार तक्रार करूनही संबंधित कंपनीने ग्राहकाला प्रतिसाद न दिल्याने ग्राहकाने ग्राहक पंचायतीच्या शिंदखेडा शाखेशी संपर्क करून आपली तक्रार नोंदविली. प्रा.डागा यांनी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.जे.टी.देसले यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मॅनेजर ब्लू स्टार कंपनी मुंबई, अ‍ॅमेझोन ऑनलाईन शॉप भिवंडी, विनायक पाटील, सर्व्हिस इंजिनियर पुणे, विराट कोहली, क्रिकेटर (जाहिरात प्रमोटर) मुंबई, मॅनेजर, रेपिट कुल सर्व्हिस धुळे यांना पत्र पाठविले. ग्राहक पंचायतीच्या दणक्याने कंपनीकडून राजपाल यांना एसी बदलून नवीन एसी मिळाला आहे.

सविस्तर असे, शिंदखेड़ा येथील आदर्श कॉलनीतील रहिवासी दीपक प्रदीपकुमार राजपाल यांनी 20 ऑक्टोबर 2019 रोजी अ‍ॅमेझॉनच्या ऑनलाईन विक्रेत्यामार्फत बजाज फायनांन्सचा ईएमआय लावून ब्लू स्टार कंपनीचा ( मॉडेल नंबर आसीएस18 डट्यूएस स्प्लिट एसी कॉपर) हा 45 हजार 990 रूपये किमतीचा एसी विकत घेतला. धुळे येथील रेपीड कुल सर्व्हिस सेंटरचा टेक्निशयन येऊन एसी इनस्टॉल करुन गेला. नोव्हेंबर महिन्यात थंडी असल्याने थंडी ओसरल्यावर एसी सुरु केल्यावर लक्षात आले की, एसी थंडावा देत नाही. एसी बदलून मिळावा, यासाठी राजपाल यांनी कंपनीशी संपर्क साधला. परंतु कंपनीकडून प्रशांत पाटील यांनी एसी बदलून मिळणार नाही, असे उत्तर दिले.

पाठपुराव्यामुळे ग्राहकाला मिळाला एसी
एसीचा पीसी खराब झाल्यामुळे कंपनीला पीसी पाठवा, असे कंपनीकडून ग्राहकाला सांगण्यात आले. इंजिनियर विनायक पाटील यांचा फोन नंबर दिला. त्यांनीही एसी बदलून देण्यास नकार दिला. अमेझॉन कंपनीशी संपर्क केला. ‘आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही कंपनीलाच संपर्क करा’ अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. अखेर राजपाल यांनी ग्राहक पंचायतीचे रवींद्र ठाकुर आणि प्रा.डागा यांच्याशी संपर्क साधला. तक्रारीचे निवारण करण्यासाठी लेखी निवेदन दिले होते. ग्राहकाच्या तक्रारीनुसार शाखेच्या प्रा.चंद्रकांत डागा आणि रवींद्र ठाकूर यांनी पाठपुरावा करून ग्राहकाला नवीन एसी मिळवून दिल्याने ग्राहकाने समाधान व्यक्त केले आहे.