पाचोरा ( प्रतिनिधी ) विजय पाटील
चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील २७ वर्षीय इसमाने त्याचा ६ वर्षाचा मुलगा व ४ वर्षाच्या मुलीसह नगरदेवळा रेल्वे प्लॅटफॉर्मवर रविवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सचखंड एक्स्प्रेसखाली झोकुन घेत आत्महत्या केल्याचे दुर्दैवी घटना घडली असून रेल्वे अंगावरून गेल्याने तिघांचेही मान अलग व शरीरापासून धड अलग झाले होते. पती – पत्नीत काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू असल्याने नगरदेवळा जवळील पिंपळगाव येथील माहेर असलेल्या पत्नीने शनिवारी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पती विरुद्ध तक्रार दाखल केली होती.
व पत्नी भाऊ आणि काकांसोबत माहेरी निघुन आल्याने त्या भितीपोटी आपल्या सह दोन लहान मुलांचीही आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली असावी. असा तर्कवितर्क लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे पती ने मुलांसह आत्महत्या केल्याची कुजबुज कानी आल्यानंतर पत्नीने दुपारी २ वाजुन ३० मिनिटांनी चाळीसगाव ग्रामिण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
चाळीसगाव शहरापासून सुमारे ८ कि. मी. अंतरावर असलेल्या बोरखेडा येथील जितेंद्र दिलीप जाधव यांचा विवाह नगरदेवळा ता. पाचोरा जवळील पिंपळगाव खु” येथील पुजा हिच्याशी सन – २०११ मध्ये झाला होता. त्यांना चिराग नावाचा ६ वर्षाचा मुलगा व खुशी नावाची ४ वर्षाची मुलगी असे दोन्ही अतिशय गोंडस बाळ होते. जितेंद्र जाधव हा नामांकित जे. सी. बी. चालक असल्याने तो चाळीसगाव येथील जे. जे. आण्णा टावर या मक्तेदाराकडे जे. सी. बी. चालक म्हणुन काम करत होता. जे. सी. बी. चे काम हे चाळीसगाव तालुक्यातील डोण पिंप्री येथे सुरू असल्याने पती, पत्नी व दोघ मुलांसह ते डोण पिंप्री येथे राहत होते. दरम्यान जितेंद्र व पुजा यांच्यात अधुन मधुन कौटुंबिक वाद होत असल्याने पुजा हिने तिचा भाऊ भुषण, काका सुधाकर व काकु यांना चाळीसगाव येथे बोलावुन ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र याचे विरुद्ध तक्रार दाखल केली होती. व त्यावेळी जितेंद्र हा पुजा हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे तिने बोलुन दाखविले होते. दरम्यान पुजा ही तिचा भाऊ, काका व काकु सोबत परस्पर चाळीसगावहुन पिंपळगाव येथे माहेरी निघून आली होती. तर जितेंद्र हा दोघ मुलांना सोबत घेऊन बोरखेडा येथे आपल्या मुळगावी आला होता.
रविवार दि. १३ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान जितेंद्र हा मुलगा चिराग व मुलगी खुशी यांना सोबत घेऊन गावाबाहेर पडला. व बस स्थानकावरील हाॅटेलवर त्याने दोघ आवडत्या मुलांना पाव वडे खाऊ घातले. व त्यानंतर ते दिसेनासे झाल्याने जितेंद्र याचा भाऊ व वडिलांना शंका आल्याने त्यांनी मुलांचा व जितेंद्र याचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान त्यांनी कजगाव, वाघळी पर्यंत रेल्वे रुळ पिंजुन काढल्यानंतर ते आढळुन न आल्याने त्यांचा नगरदेवळा रेल्वे स्थानका लगत राहत असलेले नातेवाईक नाना अहिरे यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवुन शोध घेण्यास सांगितले. नाना अहिरे हे शोध घेत असतांनाच त्यांच्या नजरेस जितेंद्र, चिराग व खुशी ही दोन तुकडे झालेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी बोरखेडा येथे घटनेविषयीची माहिती दिली.
अमृतसरहुन नांदेड कडे जाणारा सचखंड एक्स्प्रेस हा ६ तास उशिरा धावत असल्याने तिघांनी रविवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सरखंड एक्स्प्रेसखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती पाचोरा येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांना मिळताच पी. एस. आय. शब्बीर शेख, हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार व काॅन्स्टेबल प्रविण वाघ यांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिका चालक बबलु मराठे व किशोर लोहार यांनी पाचोरा ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे बोरखेडा गावी मोठी शोककळा पसरली आहे.