भुसावळातील क्रिकेट स्पर्धा : साकेगावचा संघ ठरला विजेता
साकेगावातील उन्नती क्रिकेट संघाने गडी राखून पटकावले अजिंक्यपद : अनिकेत पाटील व मित्र परीवारातर्फे यशस्वी आयोजन
भुसावळ : शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या स्व.निखील खडसे स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत अखेरच्या दिवशी अंतिम सामना साकेगावच्या उन्नती संघाने जिंकत या स्पर्धेत आपली छाप उमटवली. स्पर्धेच्या समारोपासाठी सिने अभिनेत्री श्रावणी गोस्वामी यांनी विशेष उपस्थिती देत खेळाडूंचा उत्साह वाढवला. खेळाडूवृत्ती वाढविण्यासाठी क्रिकेटचे योगदान महत्वाचे असल्याचे सिने अभिनेत्री गोस्वामी म्हणाल्या.
साकेगावच्या संघाने पटकावला चषक
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर अनिकेत पाटील मित्र परीवारातर्फे बुधवार, 9 फेब्रुवारीपासून पाच दिवस स्व. निखील खडसे स्मृतीचषक क्रीकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रविवारी तन्वी इलेव्हन -2 साकेगाव व उन्नती साकेगाव या दोन्ही संघात चुरशीची लढत होवून साकेगावच्या उन्नती संघाने सात गडी राखून अजिंक्यपद मिळवले तर तन्वी इलेव्हन संघ उपविजेता ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघाला माजी मंत्री एकनाथराव खडसे, सिने अभिनेत्री श्रावणी गोस्वामी, खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे, चित्रपट निर्माते मानव सोहेल आदींच्या हस्ते पारीतोषिक वितरण करण्यात आले.
अखेरचा सामना अत्यंत चुरशीचा
अनिकेत पाटील मित्र परिवार व अफ्फान क्रिकेट क्लबतर्फे राज्यस्तरीय स्व. निखील खडसे स्मृती चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाच दिवसीय या स्पर्धेत रविवारी अंतीम सामन्यात तन्वी इलेव्हन 2 साकेगाव व उन्नती साकेगाव या दोन्ही संघात चुरशीची लढत झाली. प्रथम फलंदाजी तन्वी संघाने करीत 71 धावांचे लक्ष ठेवले. उन्नती संघाने सात गडी राखून दमदार फलंदाजी करीत अंजिक्यपद मिळवले. या चुरशीच्या सामन्यात उन्नती संघाचे पहिले दोन गडी धावबाद झाले तर तिसरा गडी झेलबाद झाला. मात्र संघाने डाव सावरत अजिंक्यपद मिळवले. या संघाला माजी मंत्री एकनाथराव खडसे, सिने अभिनेत्री श्रावणी गोस्वामी यांच्या हस्ते 51 हजार रुपयांचे पारीतोषिक देण्यात आले तर उपविजेत्या तन्वी साकेगाव संघाला 31 हजार तर तृतीय संघास 21 हजारांचे पारीतोषिक देण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, अॅड.रोहिणी खडसे, चित्रपट निर्माते मानव सोहेल, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुनील नेवे, ओबीसी सेलचे उमेश नेमाडे, किरण कोलते, आयोजक अनिकेत पाटील, रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगरसेवक युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, दिनेश नेमाडे, माजी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, बुटासिंग चितोडीया आदींसह पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.
आगामी काळातही भव्य स्पर्धा : खडसे
क्रिकेटमुळे खेळाडूंमध्ये सांघिक व खेळाडूवृत्ती जोपासली जाते. स्व.निखील खडसे यांना क्रिकेटमध्ये अधिक रस होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जळगाव व भुसावळमध्ये अनेक क्रीडा स्पर्धा झाल्या. आगामी काळातही अशा प्रकारच्या भव्य स्पर्धा होतील, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. ते म्हणाले की, भुसावळ शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाची या स्पर्धेच्या निमित्ताने सुधारणा झाली आहे. क्रिकेटसोबतच इतर सर्व प्रकारचे खेळ या मैदानावर खेळले जातील. भुसावळ शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण व्हावेत, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
शहराने नावलौकीक वाढवावा : गोस्वामी
खेळाडूवृत्ती वाढविण्यासाठी क्रिकेटचे मोठे योगदान असून आम्हीदेखील लहानपणी क्रिकेट खेळत होतो. भुसावळ शहराची सर्व प्रकारच्या खेळांमध्ये प्रगती व्हावी, अशी अपेक्षा यावेळी सिने अभिनेत्री श्रावणी गोस्वामी यांनी व्यक्त केली. गल्लीपासून अंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत खेळला जाणारा क्रिकेट हा सर्वांचा आवडता खेळ आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने व माध्यमातून भुसावळातून नवीन खेळाडू तयार होतील. मैदानी खेळांचे महत्व वाढविण्यासाठी अनिकेत पाटील मित्र परीवाराने केलेले नियोजन कौतूकास्पद असल्याचे गोस्वामी म्हणाल्या.