भुसावळ : पुरी-गांधी धाम एक्स्प्रेसमधून उतरलेल्या दोघा अल्पवयीनांकडून दोन लाख रुपये किंमतीचा गांजा भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी रविवारी दुपारी जप्त केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीत संशयीत संजना जाटवा पवार (18, जमनीटोला, सुहागपूर, पिपरीया, जि.होशंगाबाद, मध्यप्रदेश) ही सज्ञान असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली व सोमवारी भुसावळ लोहमार्ग न्यायालयात हजर केल्यानंतर 18 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, संशयीतांना हा गांजा ओरीसा येथून आणत तो भुसावळातच विक्री होणार होता हे स्पष्ट झाले असून पोलिस कोठडीतील चौकशीनंतर साखळीचा उलगडा होणार आहे.
संशयीतांनी लपवली नावे
सुरूवातीला ताब्यात घेतलेल्या दोघांनी आपली खोटी नावे सांगितली होती मात्र पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांनी कौशल्याचा वापर करीत व संशयीत राहत असलेल्या भागात तपास केल्याने त्यांनी दोघांची खरी नावे मिळवली व आधारकार्डवरून अल्पवयीन तरुणी ही सज्ञान असल्याचे निष्पन्न करीत तिला अटक केली तर दुसर्या अल्पवयीनास बाल न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर बाल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.