एरंडोलनजीक सराफा व्यावसायीकाला पिस्टल लावत नऊ लाखांचा ऐवज लंपास

भुसावळ/एरंडोल : दुकानावरून घराकडे परतणार्‍या सराफा व्यावसायीकाला रस्त्यात गाठत दरोडेखोरांनी गावठी पिस्टलाचा (pistal) धाक दाखवून व चाकूहल्ला करीत त्याच्याकडील 150 ग्रॅमचे सोन्याच्या दागिण्यांसह चार किलो चांदी दुचाकी व मोबाईल मिळून सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लांबवण्यात आल्याची घटना बुधवार, 16 रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास एरंडोल शहराजवळील चोरटक्की गावाजवळ घडली. लुटीनंतर चोरटे रींगणगावच्या दिशेने पसार झाले. भरदिवसा सराफा व्यावसायीकावर टाकण्यात आलेल्या दरोड्यामुळे सराफा व्यावसायीकांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात (erandol police station) अज्ञात तीन तरुणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसा पडलेल्या दरोड्याने खळबळ
सूत्रांच्या माहितीनुसार, माळपिंप्री रहिवासी सराफा व्यावसायीक राजेंद्र बबनशेठ विसपुते (50) यांचे एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे समर्थ ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. सकाळी नऊ वाजता दुकान उघडल्यानंतर दुपारी दोन वाजता ते दुकान बंद करून मूळ गावी माळपिंप्री येथे जातात. त्यांच्या दिनचर्येवर लक्ष ठेवून 25 ते 30 वयोगटातील अज्ञात तरुणांनी चोरटक्की गावापासून एक किलोमीटर अंतरावर बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राजेंद्र विसपुते यांच्या दुचाकीपुढे त्यांची दुचाकी (एम.एच.19 बी.व्ही.0428) लावून अडवत काही कळण्याआत विसपुते यांच्यावर पिस्टल (pistal) रोखली तर दुसर्‍याने डाव्या हाताच्या खांद्यावर चाकूने हल्ला चढवला तर तिसर्‍याने दुचाकीला लावलेली ऐवज असलेली पिशवी हिसकावून काढून घेतली.

9 लाखांच्या ऐवजावर डल्ला
सराफा व्यावसायीक विसपुते यांच्याकडील बॅगेत 150 ग्रॅम वजनाचे व सहा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तर दोन लाख रुपये किंमतीी चार किलो चांदी, 52 हजारांची रोकड तसेच 10 हजारांचा मोबाईल तसेच दुचाकी (एम.एच.19 सी.बी.9781) मिळून आठ लाख 87 हजारांचा ऐवज होता.

चोरट्यांची दुचाकी पडली बंद
लुटारूंनी लूट करण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे काळ्या कापडाने बांधून झाकल्याने त्यांची ओळख पटली नसलीतरी लूट झाल्यानंतर चोरट्यांकडील शाईन दुचाकी (एम.एच.19 बी.व्ही.0428) जागेवरच बिघडल्याने त्यांची पंचाईत झाली मात्र चोरट्यांनी विसपुते यांची दुचाकी हिसकावून त्याद्वारे पळ काढला. या प्रकारानंतर विसपुते यांनी रस्त्यावरून जाणार्‍या इसमाला थांबवत त्याच्या मोबाईलवरून भावाशी संपर्क साधला व नंतर एरंडोल पोलिसात धाव घेत पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्याकडे आपबिती कथन केल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट जाहीर करण्यात आला. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी एरंडोल पोलिस ठाण्याला भेट देत घटना जाणून घेत तपासाबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, घटनास्थळावरून चोरट्यांची दुचाकी जप्त करण्यात आली असून त्याद्वारे चोरट्यांचा शोध लागण्याची शक्यता आहे.