नंदुरबार येथील एकलव्य प्रशिक्षण उपकेंद्रात पुस्तकं उपलब्ध करून द्यावीत.

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संचलित नंदुरबार येथील एकलव्य प्रशिक्षण उपकेंद्रात स्पर्धा परीक्षांची व इतर पुस्तकं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी प्र-कुलगुरू डॉ.बी.व्ही.पवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
एकलव्य प्रशिक्षण उपकेंद्रात नवीन पुस्तकांची नितांत आवश्यकता आहे, तिथे नियमितपणे अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असून अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. मात्र उपकेंद्रात सध्या उपलब्ध असणारी पुस्तकं ही जुनी असून गेल्या पाच ते सहा वर्षात मागणी करूनही तेथे विद्यापीठाकडून कोणतीही पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत.

नंदुरबार सारख्या जनजाती बहुल भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका किंवा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध नसून एकलव्य प्रशिक्षण उपकेंद्राचा ग्रामीण आणि जनजाती विद्यार्थ्यांना चांगला लाभ होतांना दिसतो आहे. परंतू स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने नवीन अपडेटेड पुस्तकं अभ्यासासाठी आवश्यक असतांना विद्यार्थी नाईलाजाने जुनी पुस्तकं रेफर करीत आहेत. त्यामुळे अमोल मराठे यांनी प्र-कुलगुरूंची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षा, संदर्भ ग्रंथ इत्यादी नवीन पुस्तकं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी केली. तसेच बसेस बंद असल्याने विविध साप्ताहिके, पाक्षिके, मासिके येणे देखील बंद असल्याने त्यामुळेही विद्यार्थ्यांना अडचणी आहेत, त्यासाठी पर्यायी मार्गाने साप्ताहिके, पाक्षिके, मासिके उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी अशीही मागणी निवेदनात केलेली आहे.