भुसावळ शहर वाहतूक शाखेचे जुन्या उपअधीक्षक कार्यालयात स्थलांतर होणार
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे : भुसावळात ओपन जीमचे उद्घाटन
भुसावळ : पोलिस दलातील कर्मचारी सुदृढ व तणावमुक्त असल्यास तो अधिक प्रभावीपणे आपले काम बजावू शकेल त्यासाठी पोलिस कर्मचार्यांनी या जीमचा अधिकाधिक वापर करावा तसेच तरुणांसह वृद्धांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी येथे केले. त्यांच्याहस्ते आरपीडी रस्त्यावरील पोलिस वसाहतीत ओपन जीमचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
पोलिसांवरील विश्वास सार्थ ठरवावा : अधीक्षक
अधीक्षक डॉ.मुंढे म्हणाले की, आगामी दोन महिन्यात चिल्ड्रन पार्क व जीमचे काम वेलफेअर निधीतून करण्यात येईल तसेच आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नित्यनियमाने जीमचा वापर करावा, असेही ते म्हणाले. नागरीकांचा पोलिसांवर विश्वास असतो तो सार्थ ठरवावा, असे सांगून त्यांनी भुसावळबद्दल काहीही माहिती हवी असल्यास पोलिस निरीक्षकांऐवजी पोलिस उपअधीक्षकांशी बोलावे लागते मात्र भविष्यात ती वेळ येवू नये, अशी अपेक्षा त्यांनी प्रभारी अधिकार्यांकडून व्यक्त केली तसेच शहर वाहतूक शाखेचे कार्यालय जुन्या पोलिस उपअधीक्षक कार्यालयात स्थलांतरीत करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.
मुख्याधिकारी म्हणाले ; आता परीस्थिती बदली
मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले की, पोलिस अधीक्षक माझ्या जिल्ह्यातले असल्याने त्यांच्याहस्ते होणारा गौरव निश्चित माझ्यासाठी आयुष्यातील मोठा क्षण आहे. भुसावळात काम करताना वेगळेच चित्र अनुभवास आले. आधी स्वप्नात आमच्या भुसावळकर यायचे मात्र आता परीस्थिती उलट आहे कारण विकासकामे जोमात सुरू आहेत. पोलिसांच्या जीमसाठी दर्जेदार साहित्याचा वापर करण्यात आला असून जीमचा प्रभावी वापर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलिस प्रशासनाच्या सहकार्यामुळे काही कठोर निर्णय घेणे शक्य झाल्याचे ते म्हणाले.
नियमित फिटनेस गरजेचा : पोलिस उपअधीक्षक
पोलिस कर्मचार्यांसाठी नियमित फिटनेस गरजेचा असून आगामी काळात वेलफेअर निधीतून कर्मचार्यांसाठी स्टडी रूम उभारण्याचा मनोदय पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी व्यक्त केला. मुख्याधिकार्यांच्या कार्याचे कौतुक करीत याकामी शहर वाहतूक शाखेचे स्वप्नील नाईक यांनी वेळोवळी घेतलेली दखल कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड म्हणाले की, भुसावळातील गुन्हेगारीमुळे पोलिस अधीक्षकांना नियमित येथे यावे लागत होते मात्र आता तशी वेळ येणार नाही मात्र अधीक्षकांनी सदिच्छा भेट जरूर द्यावी, असेही ते म्हणाले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक स्वप्नील नाईक, पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी शहर, बाजारपेठ व शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.