एरंडोलनजीक भर दिवसा सराफावर पडलेल्या दरोड्याची उकल : चौकडी जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह एरंडोल पोलिसांची संयुक्त कारवाई : 2 दुचाकी जप्त
भुसावळ/एरंडोल : रवंजा येथील सराफा व्यावसायीकाला गावठी कट्टा लावून तसेच चाकू हल्ला करून लुटारूंनी नऊ लाखांचा ऐवज असलेली बॅग लांबवल्याची घटना बुधवार, 16 रोजी दुपारी अडीच वाजता एरंडोल शहरापासून काही अंतरावर असलेल्या चोरटक्की गावाजवळ घडली होती. दरोड्यानंतर लुटारू सराफाची दुचाकी घेवून पसार झाले होते. या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा व एरंडोल पोलिसांकडून समांतर तपास सुरू होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत तर एक आरोपी पसार असून त्याच्याकडे गुन्ह्यातील मुद्देमालासह गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
चौघा आरोपींसह दोन दुचाकी जप्त
दिगंबर उर्फ डिग्या रवींद्र सोनवणे (23, रा.भोकर, जि.जळगाव), विशाल अरुण सपकाळे (21, कोळीपेठ, विठ्ठल मंदिराजवळ, जळगाव), विशाल लालचंद हरदे (26, चौगुले प्लॉट, जळगाव) व संदीप राजू कोळी (21, कुरंगी, ता.पाचोरा, ह.मु.कुसुंबा, ता.जळगाव) या चौघांना अटक करण्यात आली तर आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे (कोळीपेठ, जळगाव) हा पसार झाला आहे. दरम्यान, संशयीत संदीप कोळी याच्या ताब्यातून मॉडीफाय केलेली दुचाकी (एम.एच.19 डी.4000) ही जप्त करण्यात आली तर सराफा व्यावसायीक विसपुते यांची लांबवलेली दुचाकी संशयीत डिगंबरच्या ताब्यातून जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेतील आरोपींपैकी काहींना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
9 लाखांच्या ऐवजावर मारला होता डल्ला
लुटारूंनी सराफा व्यावसायीक विसपुते यांच्याकडील बॅग दरोडा टाकून लांबवली होती. या बॅगेत 150 ग्रॅम वजनाचे व सहा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तर दोन लाख रुपये किंमतीी चार किलो चांदी, 52 हजारांची रोकड तसेच 10 हजारांचा मोबाईल तसेच दुचाकी (एम.एच.19 सी.बी.9781) मिळून आठ लाख 87 हजारांचा ऐवज होता.
बंद पडलेल्या दुचाकीमुळे चोरटे अडकले जाळ्यात
सराफा व्यावसायीक राजेंद्र विसपुते हे रवंजा येथील दुकान बंद करून घराकडे जात असताना विखरण मार्गावरील टेकडीजवळ त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या पाच जणांनी त्यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडत त्यांच्यावर पिस्तुल रोखले होते तर एकाने त्यांच्या डाव्या खांद्यावर चाकूने वार केल्यानंतर दुसर्या संशयीताने नऊ लाखांचा ऐवज असलेली बॅग लांबवली मात्र पळताना लुटारूंची दुचाकी बंद पडली व येथेच घात झाला मात्र सराफा व्यावसायीकाकडील दुचाकी घेवून चोरटे पसार झाले. चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकोले व एरंडोल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केलेल्या तपासाला यश आल्यानंतर गोपनीय माहितीवरून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले.