भुसावळ : रेल्वे प्रवासात चोर्या वाढल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. महानामा व झेलम तसेच आझाद हिंद एक्स्प्रेस प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन गाड्यांमध्ये चोरटे सुसाट
महानामा डाऊन एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस-5 या डब्यातील 9 व 12 नंबरच्या सीटवर बसून 26 जानेवारी 2022 अखिलेश्वर सिंग रामनंदनासिंग (अंकलेश्वर, मध्यप्रदेश) हे भरूच ते बनारस असा प्रवास करीत असताना भुसावळ जंक्शन स्थानकावरून गाडी सुटल्यावर भुसावळ-रावेर दरम्यान कोणीतरी चोरट्याने पहाटेच्या सुमारास त्यांची पर्स लांबवली. त्यात दोन मंगळसूत्र, कानातील सोन्याचे टॉप्स, नाकातील नथ, चांदीच्या तोरड्या, पायातील कडे, सोन्याची नथ, कानातील बाळी, नाकातील नथ आदी मिळून एक लाख 75 हजारांचा ऐवज होता. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार किशोर बढे पुढील तपास करीत आहे.
आझाद हिंदमध्ये चोरी
आझाद हिंद एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- सहा च्या सीट क्रमांक 42 वरून शहाबुल शेख नाशीर शेख (चांदघर नदीया, खामगाव) हे रायपूर-पुणे प्रवास करीत असताना 29 जानेवारी 22 रोजी रात्री 10.30 ते 12.30 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 36 हजारांचा मोबाईल लांबवला. हवालदार अनिल बैस हे अधिक तपास करीत आहे. दरम्यान, झेलम एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 2 मधील 6 नंबरच्या सीटवरून उत्तर प्रदेशातील लखनपुरा येथील रहिवासी भानुप्रताप कलेक्टरसिंग हे पुणे ते ग्लॉलियर असा प्रवास करीत असताना चोरट्यांनी 13 जानेवारी रोजी रात्री 2.15 वाजेच्या सुमारास त्यांचा 16 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल लांबविला. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात शुुक्रवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार अनिल बैस तपास करीत आहे.