भुसावळात पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यासह अश्लिल शिविगाळ करून धक्काबुक्की : बिल्डर पूत्रास कायद्याचा ‘धडा’ शिकवत पोलिसांच्या बेड्या

भुसावळ : पालिकेतर्फे गुरुवारपासून शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवले जात असून मोहिमेच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी पालिकेचे पथक खडका रोड भागातील अतिक्रमण हटवत असताना भाजपाचे पालिकेतील माजी गटनेते मुन्ना तेली यांचे पूत्र आशिक मुन्ना तेली यांनी पथकाशी वाद घातला तर वाद मिटवण्यासाठी आलेल्या सहा.पोलिस निरीक्षक हरीष भोये यांची कॉलर पकडून त्यांच्याशी अरेरावी करण्यात आली तसेच पोलिस कर्मचारी सुनील तडवी यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना अश्लील शिविगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. ही घटना शनिवार, 26 रोजी दुपारी एक वाजता घडली.

तर गुन्हेगारी थांबणार कशी ?
दरम्यान, राजकीय पदाधिकार्‍यांचीच मुले पोलिसांवर हात उचलत असल्यास शहरातील गुन्हेगारी थांबेल कशी? असा प्रश्न या निमित्ताने शहरातील सुज्ञ नागरीक विचारू लागले आहेत.

शिविगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा
पोलिस अधिकार्‍यांना अश्लील शिविगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी आशिक मुन्ना तेली याच्याविरोधात पोलिस कर्मचारी सुनील सुभान तउवी यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि 353, 332, 294, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.