जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेच्या या वर्षीच्या ‘जिल्हा ग्रीन (हरित) चॅम्पियन’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.
परिषदेचे अध्यक्ष डॉ. डब्ल्यु जी प्रसन्नकुमार यांनी ई-मेलद्वारे विद्यापीठाला ही माहिती कळवली आहे. भारत सरकाराच्या उच्च शिक्षण परिषदे मार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच हा पुरस्कार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी जिल्हास्तरापासून ते केंद्रीयस्तरापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसराची स्वच्छता, हरितपणा या सोबतच पाणी, ऊर्जा व्यवस्थापन, जमीनवापर व्यवस्थापन आदी निकषाद्वारे मुल्यमापन केले जाते. विद्यापीठाने स्वच्छता, ऊर्जा आणि हरित व्यवस्थापन या क्षेत्रात सर्वोत्तम पध्दतीचा यशस्वीपणे अवलंब करून आमलात आणला आहे ज्यामुळे विद्यापीठाचा परिसर अत्यंत सुंदर व देखणा झाला आहे. विद्यापीठ कर्मचारी निवास्थान तसेच मुलींचे काही वसतिगृह या ठिकाणी पाणी जिरवून हार्वेस्टींग केले आहे. काही विभागांमध्ये सौर पॅनल लावले आहेत तर एलईडीचा वापर करून विजेची बचतही केली आहे. विद्यापीठाच्या ६०० एकर पेक्षा अधिक असलेल्या परिसरात लाखो झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळेच विद्यापीठाला हा पुरस्कार जाहीर झाल्याचे प्रभारी कुलसचिव प्रा.रा.ल.शिंदे यांनी सांगितले. विद्यापीठाचा बांधकाम, उद्यान ,पाणीपुरवठा विभाग यांचे या मध्ये लक्षणीय योगदान आहे.
सोमवारी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या संदर्भात विद्यापीठाचे अभिनंदन करण्यात आले. प्राचार्य आर.एस.पाटील यांनी मांडलेल्या या ठरावाला व्य.प.सदस्य दीपक पाटील यांनी अनुमोदन दिले.