जळगाव : कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ एक महिना उरला आहे. थकबाकीची 50 टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या 31 मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कमही माफ करण्यात येत आहे. शेतकर्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता योजनेत आजच सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 107 शेतकर्यांनी चालू वीजबिल व थकबाकीची काही रक्कम असे 104 कोटी 62 लाख रुपये भरून सहभाग घेतला आहे. या शेतकर्यांनी चालू बिलांसह सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रकमेमधील शिल्लक रक्कम येत्या 31 मार्चपर्यंत भरल्यास त्यांचीही उर्वरित 50 टक्के थकबाकी संपूर्ण माफ होणार आहे. आतापर्यंत सुधारित थकबाकीची एकूण 50 टक्के रक्कम व चालू वीजबिल भरून जिल्ह्यातील 9 हजार 467 शेतकर्यांनी वीजबिल संपूर्णपणे कोरे केले आहे.
कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील 2 लाख 8 हजार 507 शेतकर्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण 1156 कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या शेतकर्यांकडे वीजबिलांपोटी 2190 कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यापैकी 50 टक्के थकबाकी तसेच सर्व चालू वीजबिलांचा येत्या 31 मार्चपर्यंत भरणा केल्यास उर्वरित 50 टक्के म्हणजे तब्बल 1095 कोटी रुपयांची माफी शेतकर्यांना मिळणार आहे. दरम्यान, ज्या शेतकर्यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करावे व या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकर्यांना करून देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
4 हजार नवीन वीजजोडण्या
आतापर्यंत जिल्ह्यात 4 हजार 700 कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. सुधारित थकबाकीमध्ये आणखी 50 टक्के माफी मिळविण्याची संधी 31 मार्चपर्यंत असल्याने कृषिपंपधारक शेतकर्यांनी सुधारित थकबाकीसह आपली सर्व चालू वीजबिले भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.