भुसावळ : राज्यभर चर्चेत आलेल्या भुसावळातील माजी नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हम्प्या हत्याकांडातील प्रमुख पाचव्या आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकण्यात नाशिक रोड पोलिसांना शुक्रवार, 4 रोजी यश आले आहे. अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान () असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
एकाचवेळी भुसावळात झाली होती पाच जणांची हत्या
भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले व मोठ्या बंधूंसह अन्य एकाची गोळीबार करून तसेच चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची घटना रविवार, 6 सप्टेंबर 2019 रोजी भुसावळात घडली होती. भुसावळात विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच एकाचवेळी पाच जणांचे हत्याकांड घडल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. आरोपींच्या हल्ल्यात माजी नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचा मुलगा रोहित उर्फ सोनू (29), मुलगा प्रेमसागर (26) तसेच मोठे बंधू सुनील बाबूराव खरात (48) व खरात भावंडांचा मित्र सुमित संजय गजरे (18) यांचा मृत्यू झाला होता तर हल्ल्यात माजी नगरसेवक खरात यांच्या पत्नी रजनी व मुलगा हंसराज देखील जखमी झाला होता.
हत्याकांडानंतर चौघे आरोपी कारागृहातच
भुसावळातील हत्याकांड प्रकरणी आरोपी मोहसीन अजगर खान उर्फ बॉक्सर, मयुरेश रमेश सुरवाडे व शेखर हिरालाल मोघे उर्फ राजा बॉक्सर, आकाश सुकदेव सोनवणे यांना अटक करण्यात आली होती तर गेल्या अडीच वर्षांपासून आरोपी अद्यापही कारागृहातच आहेत.
गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
खरात हत्याकांडातील संशयीत आरोपी अरबाज खान हा नाशिकमध्ये येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील हवालदार अनिल शिंदे, विशाल पाटील, विष्णू गोसावी, मनोहर शिंदे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे आदींनी जेलरोड परीसरातून संशयीताच्या शुक्रवारी मुसक्या आवळल्या. संशयीताला जळगाव गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.