अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयातून मुक्तळच्या ग्रामपंचायत सदस्याची हत्या : नऊ आरोपींना बोदवड पोलिसांकडून अटक
अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयातून मुक्तळच्या ग्रामपंचायत सदस्याची हत्या ः नऊ आरोपींना बोदवड पोलिसांकडून अटक
बोदवड : अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तालुक्यातील मुक्तळ ग्रामपंचायत सदस्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात नऊ संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयीतांना अटक करण्यात आली. शिवाजी गोकूळ पारधी (28) असे खून झालेल्या सदस्याचे नाव आहे.
आधी सदस्य बेपत्ता नंतर आढळला मृतदेह
बोदवड तालुक्यातील मुक्तळ ग्रामपंचायतीचे सदस्य शिवाजी गोकूळ पारधी हे शनिवार, 5 मार्चच्या दुपारी तीन वाजेपासून बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध सुरू होता तर या प्रकरणी बोदवड पोलिसात त्यांचे भाऊ सुनील गोकुळ पारधी यांनी (मुक्तळ) रविवार, 6 रोजी रात्री खबर दिल्यानंतर हरवल्याची नोंद करण्यात आली तर अनोळखीचा मृतदेह मलकापूर रोडवरील एका पुलाखाली असल्याची माहिती बोदवड पोलिसांना कळाल्यानंतर त्यांनी रविवारी रात्री उशिरा धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी रवाना केला व मयताच्या भावाने मृतदेह आपल्याच भावाचा असल्याची ओळख पटवली. दरम्यान, मयताचे 21 वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध असल्याने त्यातूनच आरोपींनी भावाची हत्या केल्याचा आरोप मयताच्या भावाने केल्यानंतर तक्रार नोंदवल्यानंतर काही तासातच गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.
यांच्याविरोधात दाखल झाला खुनाचा गुन्हा
सुनील गोकुळ पारधी यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी रवीना उर्फ धनश्री सचिन कोल्हे (21), सचिन श्रीधर कोल्हे (32), श्रीधर रामधन कोल्हे (59), अमोल श्रीधर कोल्हे (30), नितीन भास्कर कोल्हे (32), निर्मलाबाई श्रीधर कोल्हे (50, सर्व राहणार मुक्तळ, ता.बोदवड) व पुंडलिक यशवंत वारके (49), पल्लवी पुंडलिक वारके (36) व एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले. संशयीतांविरोधात गुरनं.26/2022, भादंवि 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताना न्यायालयात हजार केले असता 11 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, उपनिरीक्षक शरद माळी, एएसआय सुधाकर शेजोळे, हवालदार वसंत निकम, नाईक शशीकांत महाले, नाईक सचिन चौधरी, कॉन्स्टेबल मुकेश पाटील, निलेश सिसोदे, निखील नारखेडे, दीपक पाटील, मनोहर बनसोडे आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.