घनकचरा प्रकल्पाच्या कामाला कार्यादेश देण्यात आता उशीर का ?
आधीच प्रकल्प लांबला, आता अजून किती लांबवणार :
जळगाव – जळगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणाऱ्या घनकचरा प्रकल्पाच्या कामाचा अजून कार्यादेश देण्यात आला नाहीये.सर्वात महत्वाचे म्हणजे ठराव मंजूर होऊन १ महिना पूर्ण होऊनही प्रशासनाकडून मक्तेदाराला कार्यादेश दिला गेलेला नाही. भाजपच्या विरोधानंतर हा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. अश्यावेळी थांबलेल्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. मात्र, मनपा प्रशासनाकडून ठराव होवून अद्यापही संबधित मक्तेदाराला काम सुरु करण्यासाठी कार्यादेश देण्यात आला नसल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे एकीकडे घनकचरा प्रकल्पाच्या कामासाठी पदाधिकाऱ्यांकडून उशीर होत असल्याचा आव प्रशासनाकडून आणला जात होता. मात्र, दुसरीकडे आता पदाधिकाऱ्यांनी महासभेत या ठरावाला मान्यता दिल्यानंतरही मनपाकडून घनकचरा प्रकल्पाच्या कामाला आता उशीर का केला जात आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
रस्त्यांचे काम झाल्यानंतर खोदकाम करणार का ?
शहरातील रस्त्यांच्या कामांना काही भागात सुरुवात झाली आहे. तर काही भागात लवकरच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. महापालिकेच्या महासभेत शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात होण्याआधी खासगी कंपन्यांचे केबल टाकण्याचे काम आटोपून घेण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. मात्र, याबाबत देखील ठराव झाल्यानंतरही मनपाने या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे सुरु झाली व त्यानंतर हे काम दिले गेले तर झालेले रस्ते पुन्हा खोदावे लागतील व रस्त्यांची पुन्हा वाट लागेल अशी भिती व्यक्त केली जात आहे.